esakal | राष्ट्रवादीचे विदर्भात संवादाचे सिंचन, मोठा भाऊ होण्यासाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader and minster jayant patil visit to vidarbha from today

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला दीड दशक लोटले आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. यानंतरही आमदारांची संख्या वाढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतके उमेदवार निवडून येतात.

राष्ट्रवादीचे विदर्भात संवादाचे सिंचन, मोठा भाऊ होण्यासाठी धडपड

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात का वाढत नाही याचा शोध घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गुरुवारपासून विदर्भातून दौऱ्यास प्रारंभ करणार असून प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेऊन ते संवादाचे सिंचन करणार आहेत. विदर्भात जोर मारल्याशिवाय 'मोठा भाऊ' होता येणार नाही याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादीचा आता सर्व फोकस विदर्भावर राहणार आहे. 

हेही वाचा - युट्यूब बघितले अन् सूचली भन्नाट आयडिया, घरीच फक्त १५ रुपयांत तयार करतोय गावरानी कोंबडीचे पिल्लू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला दीड दशक लोटले आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. यानंतरही आमदारांची संख्या वाढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोटावर मोजण्याइतके उमेदवार निवडून येतात. तब्बल पंधरा वर्षे आघाडीची सत्ता होती. महत्त्वाची खातीही काही नेत्यांना सोपवण्यात आली होती. मात्र, नेत्यांचा मतदारसंघ सोडता पक्षाचा विस्तार झालेले नाही. उलट पक्ष वाढण्याऐवजी अधिकच कमजोर झाल्याचे दिसून आले आहे. ही बाब राष्ट्रवादीने चांगलीच मनावर घेतली आहे. आता त्यांनी स्थानिक नेत्यांनाच कामाला लावले आहे. एवढेच नव्हे तर जबाबदारीसुद्धा निश्चित केली आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातून दौऱ्याला प्रारंभ करून सर्वांना संदेशही दिला आहे. 

हेही वाचा - देशातील शासकीय रुग्णालयात लठ्ठपणावर पहिली शस्त्रक्रिया नागपुरात; १८७ किलोचा माणूस झाला ८२ किलोचा

नेत्यांना लावले कामाला -
राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मर्यादित आहे. आमदारांची संख्याही जवळपास निश्चितच आहे. विस्तारासाठी विदर्भात मोठी संधी आहे. मात्र, स्थानिक नेते फारसे मनावर घेत नसल्याचे प्रमुखांना आढळून आले. तशी खंतही त्यांनी बोलवून दाखवली. दुसरा उमेदवार निवडूण आला तर आपल्या मंत्रिपदाचे काय? या भीतीने अनेक नेते आपला मतदारसंघच कसा शाबूत राहील यावरच सर्व शक्ती आजवर खर्ची घालत होता. आता त्यांनाच कामाला लावण्यात आले असल्याचे समजते. 

हेही वाचा - Great : तेरा एकर शेतीच नियोजन अन् पूर्णवेळ ढाब्याची जबाबदारी; व्यवसायातून जोपासले सामाजिक दायित्व

गैरसमज दूर करणार - 
पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी म्हणून राष्ट्रवादीला संबोधले जाते. विदर्भाच्या अनुशेषाला राष्ट्रवादीच कारणीभूत आहे, विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळविला जातो, असा आरोप राष्ट्रवादीवर आहे. विरोधकांनाही मतदारांवर बिंबवण्यात तसे यश आले आहे. त्यामुळे विदर्भात भाजप चांगलीच फोफावली आहे. मतदारांमधील भ्रम दूर करून आमचे विदर्भावर लक्ष आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्यावतीने केला जात आहे.