esakal | रुग्णालयात बेड, तर घाटांवर नाही ओटे; दोन ओट्यातील मोकळ्या जागेतही अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

last rituals
रुग्णालयात बेड, तर घाटांवर नाही ओटे; दोन ओट्यातील मोकळ्या जागेतही अंत्यसंस्कार
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील १६ घाटांवरील दीडशे ओटेही अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. दोन ओट्यातील मोकळ्या जागेतही अंत्यविधी करण्यासाठी कुटुंबीयांना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे शहरात दिडशेवर अंत्यसंस्कार होत असल्याने शासकीय माहितीनुसार कोरोनाबळीची संख्या १०० किंवा ११० पर्यंतच कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड बाधितांना रुग्णालयात बेड मिळत नसताना अंतिम संस्कारासाठी घाटांवरही जागा मिळत नसल्याचे करुण चित्र सर्वत्र आहे.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

शहरात मानकापूर, मानेवाडा, गंगाबाई घाट, वैशालीनगर, मोक्षधाम, अंबाझरी, सहकारनगर, पारडी, नारा, नारी, वाठोडा, दिघोरी, फ्रेंड्स कॉलनी, भरतवाडा, कळमना, शांतीनगर असे १६ घाट आहेत. यात दोन घाटावर डीझलवाहिनी तर तीन घाटांवर एलपीजीवाहिनी आहे. घाटांवर अंत्यसंस्कारासाठी १५० ओटे आहेत. याशिवाय, डिझेल व एलपीजी वाहिनीवर दररोज ४० पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येमुळे ओटेही कमी पडत आहेत. त्यामुळे दोन ओट्यातील मोकळ्या जागेतही अंत्यसंस्कार केले जात आहे. अर्थात दररोज दीडशे ते दोनशे पार्थिवावर सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत अंत्यसंस्कार केले जात आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांनो! 11च्या आधी पोहोचा कार्यालयात, अन्यथा जावे लागेल पोलिस ठाण्यात

अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कुटुंबीयांना सकाळी राख घेऊन जाण्यास सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात दिडशेवर अंत्यसंस्कार होत असल्याचे सूत्राने नमूद केले. बळींची संख्या १०० किंवा ११० पर्यंत असताना इतर पार्थिव कुठून येते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बाधितांचाही उपचारादरम्यान मृत्यू होतो, त्यांच्या पार्थिवावरही शहरात अंत्यसंस्कार केले जात आहे.

फक्त मेयो, मेडिकलमधील बळींचीच नोंद -

शहरात मेयो, मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांचीच कोरोना बळींमध्ये नोंद होत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली. बोटांवर मोजण्याइतपत खासगी रुग्णालयाचा अपवाद सोडला तर बहुतांश खासगी हॉस्पिटलमधील मृत्यूची नोंदच कोरोनाबळीमध्ये होत नसल्याचे समजते.

शहरातील १६ घाटांवरील १५० ओट्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. याशिवाय डिझेल व एलपीजीदाहिनीवर अंत्यसंस्कार केले जाते. सद्यःस्थिती मोठया प्रमाणात पार्थिव येत असल्याने अनेकदा दोन ओट्यातील मोकळ्या जागेतही अंत्यसंस्कार केले जाते. अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे आदींचा दररोज सकाळी आढावा घेतला जातो. अंत्यसंस्कारासाठी लाकूड उपलब्ध करून दिले जाते.
- डॉ. प्रदीप दासरवार, प्रभारी उपायुक्त, महापालिका.