esakal | कोरोनामुळे आणखी एका कैद्याचा मृत्यू, फसवणुकीच्या प्रकरणात भोगत होता शिक्षा

बोलून बातमी शोधा

Corona

कोरोनामुळे आणखी एका कैद्याचा मृत्यू, फसवणुकीच्या प्रकरणात भोगत होता शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्यवर्ती कारागृतील आणखी एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारीच मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच दोन मनोरूग्णांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या मलकित सिंग कर्मासिंग कलोटी (७७) या कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने मलकित सिंगला शिक्षा सुनावली होती. कारागृहात तो शिक्षा भोगत असतानाच त्याला कोरोना झाला. त्याची मेडिकलमध्ये तपासणी करून त्याच्यावर कारागृहातच उपचार सुरू होते. १८ एप्रिल रोजी मलकित सिंगची प्रकृती ढासळल्याने त्याला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

मानकापूर येथील प्रादेशिक मनोरूग्णालयात साजन हेला कोरकू (५१) आणि मोला रघुनाथ गायधने (८६) हे दोघे मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. उपचार घेत असतानाच मनोरूग्णालयात कोरोनाने शिरकाव केला. त्यात साजन आणि मोला यांना कोरोनाची लागण झाली. डॉक्टरांनी मनोरूग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी सहाच्या सुमाास साजनचा मृत्यू झाला. साजनच्या मृत्यूला बारा तास होत नाही तोच सायंकाळी सहाच्या सुमारास मोलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.