esakal | आता पार्सलचेही होणार वांदे! लॉकडाउनमुळे डिस्पोजल्स मिळेना

बोलून बातमी शोधा

parcel
आता पार्सलचेही होणार वांदे! लॉकडाउनमुळे डिस्पोजल्स मिळेना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लहान हॉटेल्स पार्सल सुविधा देण्यासाठी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्पोजल्सचा वापर केल्या जातो. आता पुन्हा टाळेबंदी १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. एक महिना दुकाने बंद असल्याने हॉटेल्स व्यावसायिकांनी जवळ असलेले सर्व डिस्पोजल्स पार्सल, चहा नाश्ता ग्राहकांना देण्यात वापरले. मात्र, ते संपल्याने व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न या हॉटेल्स व्यावसायीकांसमोर निर्माण झाला आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

टाळेबंदीदरम्यान हॉटेल्समधून केवळ पार्सलची सुविधा देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दूध, भाजीपाल्यासह औषधींचे दुकान सुरू आहेत. यांना पूरक असलेल्या अनेक वस्तूंची दुकाने बंद आहेत. हॉटेल्सला पार्सल देताना प्लास्टीकचे डबे, वाट्या, चमचे आणि इतर साहित्य लागत असते. याशिवाय चहाचे कप यांचाही समावेश असतो. शहरात या वस्तूंची गांधीबाग परिसरात होलसेल दुकाने आहेत. मात्र, टाळेबंदीमुळे सर्वच दुकाने गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत. त्यातूनच शहरातील इतर परिसरात असलेल्या छोट्या दुकांनामध्ये असलेला माल जवळपास संपला आहे. शहरातील छोटे हॉटेल्स व्यावसायीक याच दुकानातून डिस्पोजल्स खरेदी करीत असतात. मात्र, आता त्यांच्याकडेच माल नसल्याने नियमित ग्राहकांना चहा, नाश्ता आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नातेवाइकांना पार्सल मिळणार नाही. विशेष म्हणजे टाळेबंदीच्या काळात सामान्यांना आधार असलेल्या छोट्या व्यावसायिकांना हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

कोरोनामुळे वाढला वापर -

कोरोनाबाधितांना जेवण असो की चहा यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्पोजल्सचा वापर केल्या जातो. गेल्या दोन महिन्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने डिस्पोजल्सचा वापर बराच वाढला आहे. मात्र, आता माल अपुरा पडत आहे.

गेल्या महिन्याभरापासून टाळेबंदी असल्याने हॉटेलसाठी आवश्यक असलेले डिस्पोजल्स खरेदी करता आले नाही. आता पुन्हा टाळेबंदी केल्याने त्याची खरेदी करता येणे अशक्य आहे. त्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.
-दिनेश व्यास, हॉटेल व्यावसायिक