esakal | मा. गो. वैद्य यांना दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली; ट्विटरवरून व्यक्त केल्या भावना
sakal

बोलून बातमी शोधा

people from Indian politics tweeted about passing away of M G vaidya

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उमा भरती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अशा अनेक दिग्गज नेत्यांनी माधव गोविंद वैद्य यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली दिली आहे आणि आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.  

मा. गो. वैद्य यांना दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली; ट्विटरवरून व्यक्त केल्या भावना

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी बौद्धिक प्रमुख व प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचे आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. संघाच्या सर्वच सरसंघचालकांसोबत त्यांनी कार्य केले होते. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला. हिंदुत्त्वाचे भाष्यकार म्हणून त्यांची ख्याती होती. संघाच्या या ऋषितुल्य स्वयंसेवकांच्या निधनाने संघ परिवारात तसंच राजकीय वर्तुळात दुःखाचं वातावरण आहे.  

मा. गो. वैद्य हे भाष्यकार होते तसंच कुठल्याही विषयाचे त्यांना सखोल ज्ञान होते. अनुभवी आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. अनेक दिगाजांना त्यांचा सहवास लाभला. म्हणूनच त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली आहे.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उमा भरती, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अशा अनेक दिग्गज नेत्यांनी माधव गोविंद वैद्य यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली दिली आहे आणि आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.  

हेही वाचा - RSS चे जेष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचं निधन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी: 

"द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी श्री मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. श्री वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा गो वैद्य यांनी  आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालवला आहे. श्री वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवितो," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.    

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : - 

व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व : नितीन गडकरी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांची विधानपरिषद सदस्य म्हणून कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. लहानपणापासून बाबुरावजींशी व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत. खरे तर बाबुराव शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गेल्याने अतीव दु:ख झाले, अशी भावना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 

माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस: 

संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती : 

"मला माझ्या काही सहकाऱ्यांकडून श्री. मा. गो. वैद्य यांच्या निधनाची बातमी मिळाली. यामुळे अतिशय दुःख झाले. वैद्य जी माझ्या वडिलांसारखे होते तसेच माझे मार्गदर्शकही होते. त्यांच्या जाण्यानं माझ्या जीवनात पोकळी निर्मण झाली आहे आणि ती तशीच राहील"  अशा भावना उमा भारती यांनी व्यक्त केल्या आहेत. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार : 

देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा स्‍वयंसेवक हरपला..!
 "ज्‍येष्‍ठ विचारवंत व ज्‍येष्‍ठ संपादक मा.गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणीक, निस्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची खंत वाटते. त्‍यांनी स्‍वतःला झोकुन दिले. देश घडविण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगुन स्‍वयंसेवकांची वाटचाल सुरु असते, अशा स्‍वयंसेवकांमधील एक म्‍हणजे मा.गो. वैद्य होत. या ज्‍येष्‍ठ विचारवंताच्‍या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा महान व्यक्तिमत्वाच्या चरणी माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना." अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ: 

" श्री. मा. गो. वैद्य यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले. वैद्य जी नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी तत्पर राहिलेत. त्यांचे जीवन आम्हा सगळ्यांसाठीच महान प्रेरणा आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या पुण्यात्म्याला शांती देवो." असं ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. 

नक्की वाचा - ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असा अग्रलेख लिहीत मा. गो. वैद्य यांनी केला होता आणीबाणीचा विरोध

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग: 

" संघाशी कित्येक दशकं नाते मजबूत ठेवणारे प्रख्यात लेखक आणि विचारक श्री मा. गो. वैद्य जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे मार्गदर्शन मला प्राप्त झाले. ते आपल्या तारकांनी कोणालाही प्रभावित करत होते." असं ट्विट देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे.  

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण :

"नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। <br>न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥ श्री. मा. गो. वैद्य यांच्या निधनामुळे अतिशय दुःख झाले. " अशा भावना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.  

loading image