बरे झाले; पण प्रशिक्षण नाही, वावरणार कसे?

बरे झाले; पण प्रशिक्षण नाही, वावरणार कसे?

नागपूर : त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर ते बरे झाले. उर्वरित आयुष्य कुटुंबीयांसह आनंदाने जगायला मिळेल, ही बऱ्या झालेल्या मनोरुग्णांची इच्छा असते. परंतु, औषधांशिवाय मानसिक धक्का कधी येईल, हे सांगता येत नाही. याचे कोणतेही नियोजन न करता राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील बऱ्या झालेल्या रुग्णांना थेट भिक्षागृहाचा, अनाथाश्रमाचा तर गतिमंदांसाठी असलेल्या आश्रमात रवानगी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

मनोरुग्णांना वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातील दगडी भिंतीआड आयुष्य घालवावे लागते. यामुळे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गौरव कुमार बन्सलविरुद्ध दिनेशकुमार यांनी याचिका दाखल केली. न्यायालयाने पुनर्वसन करण्यासाठी सरकारच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, असे सुचविले. वर्षानुवर्षांपासून बाह्यजगापासून संबंध तुटल्याने अचानक प्रादेशिक मनोरुग्णालयांच्या प्रशासनाने दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविलेल्या पत्रानुसार बऱ्या झालेल्या मनोरुग्णांची थेट भिक्षागृहांसह अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात रवानगी केली आहे. 

राज्यात सध्या चार मनोरुग्णालये आहेत. पुणे मनोरुग्णालयात 2400, ठाण्यात 1050, नागपूरमध्ये 940 आणि रत्नागिरी रुग्णालयात 365 ही या मनोरुग्णालयांची क्षमता आहे. राज्यात सध्या या चार मनोरुग्णालयांत तीन हजारांवर मनोरुग्ण आहेत. यात महिला आणि पुरुषांची संख्या जवळपास सारखी आहे.

राज्यात बऱ्या झालेल्या 215 मनोरुग्णांना राज्यातील बुलडाणा येथील उमरीपठार वृद्धाश्रम, यवतमाळातील बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम, नागपुरातील पंचवटी वृद्धाश्रमासह उंटखाना येथील होम फॉर एजेड, दवलामेटीतील महानुभाव वृद्धाश्रम, खामला रोड येथील राणी दुर्गावती वृद्धाश्रम, औरंगाबादेतील श्रीकृष्ण वृद्धाश्रम, नांदेड येथील रुस्तमजी मेवावाला वृद्धाश्रम आणि लोणी खुर्द येथील इंदिरा गांधी वृद्धाश्रम, बीडमधील गुरुदास वृद्धाश्रम तर लातूर येथील पार्वती वृद्धाश्रमात रवानगी करण्यात येईल.

यात नागपूरच्या 12 जणांचा समावेश आहे. यासंदर्भात अधिक माहिती विचारण्यासाठी संचालक डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांचा फोन नुसताच खणखणत होता. नेहमीच त्यांचा फोन असाच खणखणत असतो, हे विशेष. 

प्रशिक्षणाशिवाय जीव धोक्‍यात

215 मनोरुग्ण बरे झाले आहेत, असे मनोरुग्णालय प्रशासनाने कळविले आहे. मात्र, अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात गेलेल्या या बरे झालेल्या मनोरुग्णांना बाह्य जगात वावरण्याचे प्रशिक्षण दिले नाही. ते कसे वागतील? कसे बोलतील? त्यांना आपले म्हणणे पटवून देता येत नाही. यामुळे वृद्धाश्रमात किंवा भिक्षागृहात यांना वेदनादायी अनुभव वाट्याला येण्याची भीती आहे, याचा विचार करण्यात आला नसून थेट रवानगी करण्यात आली. यामुळे त्यांचा जीव धोक्‍यात येण्याची भीती आहे. 

हा आला अनुभव

एका बऱ्या झालेल्या मनोरुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीला तिचे नाव, गाव माहीत नव्हते. आपण कोठे आहोत, काय करीत आहोत, याचेही भान नव्हते. ती व्यक्ती केवळ शून्यात बघत होती. हा अनुभव आल्यानंतर ती व्यक्ती भिक्षागृहात सुरक्षित राहील काय, हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेष असे की, टाटा ट्रस्टतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. प्रशिक्षणानंतर त्यांचे पुनर्वसन वृद्धाश्रमात किंवा भिक्षागृहात केल्यास बरे होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com