esakal | धो-धो धुतले! संततधार पावसाने नागरिकांची तारांबळ; चोवीस तासांत ७९ मिलिमीटर
sakal

बोलून बातमी शोधा

धो-धो धुतले! पावसाने नागरिकांची तारांबळ; चोवीस तासांत ७९ मिलिमीटर

धो-धो धुतले! पावसाने नागरिकांची तारांबळ; चोवीस तासांत ७९ मिलिमीटर

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : बुधवारी दिवसभर फटकेबाजी करणाऱ्या वरुणराजाने आजही दमदार हजेरी लावून नागपूरकरांना चिंब भिजविले. दुपारी व सायंकाळी बरसलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडविली. धो-धो पावसाने रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबले, अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहरात चोवीस तासांत तब्बल ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारीही नागपूरसह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिल्याने गुरुपौर्णिमाही पावसातच जाण्याची चिन्हे दिसत आहे. (Rain-News-Nagpur-Rain-News-Regional-Meteorological-Department-nad86)

बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला आहे. काल दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आजही शहरभर धो-धो कोसळला. दुपारी एकपर्यंत ढगाळ वातावरण होते. मात्र, त्यानंतर अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले आणि सर्वत्र टपोऱ्या थेंबाचा पाऊस सुरू झाला.

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

जवळपास अर्धा-पाऊण तास बरसल्यानंतर चारच्या सुमारास वरुणराजाने पुन्हा जोरदार ‘बॅटिंग’ केली. पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये कुठे गुडघाभर तर, कुठे कंबरेपर्यंत पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील जनजीवनच पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नाग व पिवळ्या नदीसह शहरातील नालेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अंबाझरीसह इतरही तलावांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. शहरात चोवीस तासांत ७९ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या दक्षिण व मध्य भारतावर ढगांची दाटी झाली आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिमोत्तर दिशेने सरकत असल्याने विदर्भात ‘वीकेंड’लाही जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात सगळीकडेच सध्या दमदार पाऊस सुरू आहे. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. येथे तब्बल २०३ मिलिमीटर पाऊस बरसला.

हेही वाचा: बालायाम योग : वाचा किती सुरक्षित आहे हा व्यायाम व फायदे

विदर्भात चोवीस तासांतील पाऊस

  • अकोला २०३ मिलिमीटर

  • नागपूर ७९ मिलिमीटर

  • ब्रम्हपुरी ६६ मिलिमीटर

  • चंद्रपूर ३५ मिलिमीटर

  • वर्धा २५ मिलिमीटर

  • वाशीम २१ मिलिमीटर

(Rain-News-Nagpur-Rain-News-Regional-Meteorological-Department-nad86)

loading image