Chotu Bhoyar Join Congress : छोटू भोयर म्हणाले, ३४ वर्षे भाजपमध्ये राहून फक्त अन्यायच मिळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडामंत्री सुनील केदार, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत, शहर कॉंग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारताना डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर

छोटू भोयर म्हणाले, ३४ वर्षे भाजपमध्ये राहून फक्त अन्यायच मिळाला

नागपूर : मागील ३४ वर्षे भाजपमध्ये होतो. २० वर्षे महापालिकेत होतो. पक्षाने दिलेले जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. तरीही पक्षाकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सोमवारी माजी उपमहापौर डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर यांनी सांगितले.

चिटणीस पार्क येथील देवडिया कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. भोयर यांचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, शहर कॉँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी, राजू पारवे यांनी कॉंग्रेसचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले. विधानपरिषद निवडणूक व आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. भोयर यांनी भाजपने केलेल्या अन्यायाच पाढाच वाचला. भाजपकडून गेली काही वर्षे अन्यायच सुरू असल्याने कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पुढील महापालिका निवडणुकी कॉंग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसचे शंभरावर नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांसोबत राहील, असेही ते म्हणाले.

भाजपमध्ये बराच काळ गेला असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसमध्ये राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. भोयर यांचे स्वागत करताना त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. भोयर यांच्यासारखे अनेकजण लवकरच पक्षात येतील व काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

रवींद्र भोयर यांनी सर्व विचार करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शहर व जिल्ह्यात काँग्रेसचे नवे पर्व सुरू झाले आहे. अनेक जण लवकरच काँग्रेसमध्ये येणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे, पदाधिकारी विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, संदेश सिंगलकर, नगरसेवक संदीप सहारे, नितीन साठवणे, गजेंद्र हटेवार आदी उपस्थित होते.

loading image
go to top