Amravati Murder : कोल्हे हत्या प्रकरणात सहा जण अटकेत; गळ्यावर केले वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Six accuse arrested in Amravati Umesh Kolhe murder case

Amravati : कोल्हे हत्या प्रकरणात सहा जण अटकेत; गळ्यावर केले वार

अमरावती : नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त टिप्पणीचे समर्थन केल्याने राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैय्यालालची गळा चिरून हत्या (murder) करण्यात आली होती. तसेच अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (५४) यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर भाजपने कोल्हे यांची हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच उमेश कोल्हेंचा खून झाल्याचे अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांनी पत्रकारांना सांगितले. (Six accuse arrested in Amravati Umesh Kolhe murder case)

ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती पोलिसांना तब्बल अकरा दिवसांचा कालावधी लागला. एनआयएची चमू अमरावती शहरात दाखल होऊन दोन दिवस त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतरच अमरावती पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत भाष्य केले. याप्रकरणात आतापर्यंत अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिसांनी सहा संशयितांना अटक (arrested) केली आहे.

हेही वाचा: मुलीचे अपहरण, धर्मांतर, लग्न अन् सामूहिक बलात्कार

मुद्दसीर अहमद ऊर्फ सोनू रजा वल्द शेख इब्राहिम (२२, रा. बिसमिल्लानगर, अमरावती), शाहरूख पठाण बादशहा हिदायत खान (२५, रा. सुफियानगर), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तसलीम (२४, रा. लालखडी), शोएब खान ऊर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२, रा. यास्मीननगर) या चौघांना २३ जून रोजी अटक केली होती. खुनात अतिब रशीद वल्द आदिल रशीद (२२, रा. मौलाना आझादनगर) व डॉ. युसूफ खान बहाद्दूर खान (४४, रा. बिलाल कॉलनी, अमरावती) यांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी शनिवारी सांगितले.

अमरावतीत २१ जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उमेश कोल्हे हे दुकान बंद करून घराकडे जात असताना शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेसमोरील गल्लीमध्ये दोघांनी गळ्यावर व शरीरावर वार करून हत्या (Murder) केली होती. नऊ दिवसांपर्यंत पोलिस हत्येचे कारण शोधूच शकले नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच एनआयएची टीम अमरावती शहरात दाखल झाली. त्यांनी चोवीस तासानंतर बऱ्याच गोष्टीचा उलगडा केल्यानंतर स्थानिक पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.

हेही वाचा: जुबेरला पाकिस्तान, सीरियातून निधी मिळाला; दिल्ली पोलिसांचा दावा

उमेश कोल्हे यांनी हत्येच्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरून नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट इतरांसोबत व्हॉटसअ‍ॅपवरून शेअर केली होती. ती पोस्ट हटविण्यासंदर्भात त्यांच्या काही मित्रांनी कोल्हे यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट हटविली होती. ज्या भागात कोल्हे यांचे प्रतिष्ठान आहे, त्या भागातील काही लोकांची त्यांनी माफी मागितली होती. परंतु, ही बाब पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली नाही. पोस्ट हटविल्यानंतर काही दिवसांनी उमेश कोल्हे यांची शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत २१ जून रोजी हत्या (Murder) झाली.

दोन्ही घटनेत बरेच साम्य

राजस्थानच्या उदयपूर येथे एका व्यक्तीची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याच पद्धतीने अमरावतीतसुद्धा (Amravati) उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून हत्या केली गेली. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्य असल्याचे दिसून येते.

हेही वाचा: ममता बॅनर्जी म्हणाल्या, द्रौपदी मुर्मूबद्दल अगोदर सांगितले असते तर...

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांसह संपर्कातील मेडिकल व्यावसायिकांची भेट घेतली. त्यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच त्यांची हत्या झाल्याची बाब पुढे आली. ती पोलिसांपुढे मांडल्यानंतर गृहविभागाकडे तक्रार केली. कारण, स्थानिक पोलिस या तपासाबाबत खरी बाब सांगत नव्हते.

- शिवराय कुलकर्णी, भाजप प्रदेश प्रवक्ते

नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्यामुळेच उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचल्या गेल्याची बाब पोलिसांनी केलेल्या तपासातून पुढे आली. त्यात एकूण सहा जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. तपास अद्यापही अमरावती शहर कोतवाली पोलिसांकडेच आहे.

- विक्रम साळी, पोलिस उपायुक्त, अमरावती

Web Title: Six Accuse Arrested In Amravati Umesh Kolhe Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top