
नागपूर न्यायालयाने शुभमच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे आदेश सदर पोलिसांना दिले. सदर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गजानन उईके यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अडचण अशी होती की, शुभमने आपले नाव शाहरुख शेख असे सांगितले होते.
चार वर्षांनंतर झाली मायलेकाची भेट; पोलिसांच्याही डोळ्यात आले पाणी!
नागपूर : चार वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या पोटच्या पोराची ती चातकाप्रमाणे वाट पाहत होती. आज येईल, उद्या येईल या आशेने ती दारात उभी राहायची. अचानक चार वर्षांनी मुलगा घरी परतला आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मायलेकाची झालेली गळाभेट पाहून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले. काही वेळासाठी तेथील वातावरणही भावुक झाले होते. शुभम असे भाग्यवान मुलाचे नाव आहे.
शुभमला आई-वडील आणि दोन बहिणी आहेत. बहिणी विवाहित आहेत. आई-वडील आणि मुलगा गुण्यागोविंदाने सदर येथील निवासस्थानी राहत होते. वडील खासगी वाहनचालक आहेत. अचानक शुभमची मन:स्थिती बिघडली. तो घराबाहेर पडला. परंतु, शोध घेऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केले.
अधिक वाचा - ताडोबाला पर्यटनासाठी जाताना सुटले गाडीवरील नियंत्रण अन् घडला मृत्यूचा थरार
मात्र, २०१६ मध्ये त्याने पुन्हा घर सोडले. रेल्वेने तो मिळेल त्या ठिकाणी गेला. तो छत्तीसगडला पोहोचला. त्याची मन:स्थिती ठीक नसल्यामुळे स्थानिक सामाजिक संस्थेने त्याला आधार दिला. नंतर स्थानिक मनोरुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखलही केले.
इकडे दिवसांमागून दिवस जात होते. मात्र, शुभमचा काही शोध लागत नव्हता. आई-वडिलांनी अनेक धार्मिक ठिकाणी शोध घेतला. कुटुंब, नातेवाईक सर्वच जण शोध घेत होते. पोलिसांनाही माहिती दिली. मात्र, शुभमचा कुठेही शोध लागला नाही.
चार वर्षे निघून गेली. त्यामुळे आई-वडिलांनीही त्याच्या परतण्याची आशा सोडली. परंतु, शुभम या चार वर्षांत पूर्ण बरा झाला. तो सर्व काही सांगू लागला. त्याने नाव आणि पत्ताही सांगितला. त्यामुळे छत्तीसगड न्यायालयाने शुभमची दखल घेतली.
क्लिक करा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
तसे नागपूर न्यायालयाला कळविले. नागपूर न्यायालयाने शुभमच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचे आदेश सदर पोलिसांना दिले. सदर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गजानन उईके यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अडचण अशी होती की, शुभमने आपले नाव शाहरुख शेख असे सांगितले होते.
त्यामुळे पोलिस हवालदार गजानन उईके यांना शुभमच्या घराचा पत्ता शोधण्यास मोठी अडचण होत होती. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शुभमचे वर्णन करत परिसरातील लोकांना विचारपूस करीत होते. परिसरातील एका सज्जनाने त्याच्या घराचा पत्ता सांगितला. कसे तरी ते शुभमच्या घरी पोहोचले. आई-वडिलांनी त्याचे छायाचित्र ओळखले.
सविस्तर वाचा - कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम
आनंदाचा क्षण टिपला डोळ्यांनी
ओळख पटल्यानंतर उईके यांनी आई-वडिलांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशाने शुभमची आई, बहीण आणि नातेवाईक असे सर्व जण छत्तीसगडला पोहोचले. शुभम दिसताच आईची गळाभेट झाली. त्याने आई, बहीण आणि इतर नातेवाइकांना ओळखले. तो आनंदाचा क्षण साऱ्यांनी डोळ्यात टिपला. आईला मुलगा मिळाला. यापेक्षा मोठे या जगात काहीच राहू शकत नाही. मात्र, यासाठी पोलिस हवालदार आणि सरकारी यंत्रणा देवदूत ठरली. गळाभेट करून देणारे हवालदार उईके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या आदेशाने पोलिस हवालदार गजानन उईके, हवालदार मिलिंद मून यांनी केली.
संपादन - नीलेश डाखोरे
Web Title: Son And Mother Visit Came Four Years Later
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..