esakal | वावर है तो पावर है! विदर्भात सर्वाधिक ऊस उत्पादन घेतात राजेश!
sakal

बोलून बातमी शोधा

वावर है तो पावर है! विदर्भात सर्वाधिक ऊस उत्पादन घेतात राजेश!

वावर है तो पावर है! विदर्भात सर्वाधिक ऊस उत्पादन घेतात राजेश!

sakal_logo
By
अशोक डाहाके

केळवद (जि. नागपूर) : शेती बुडीत व्यवसाय आहे. परवडत नाही, अशी शेतकऱ्यांची सतत ओरड सुरू असते. मात्र, सावनेर तालुक्यातील आजनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी राजेश भगल याला अपवाद ठरले. रडत बसण्यापेक्षा शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यावर त्यांचा भर असतो. राजेश यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत उसाची शेती यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. पाच वर्षांपासून ते ऊस शेतीतून विक्रमी उत्पादन घेत आहेत. अख्ख्या विदर्भात एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेण्याचा मानही त्यांनी मिळविला.

पाच वर्षांपूर्वी राजेशही शेतात पारंपरिक पद्धतीने कपाशी, सोयाबीन, तूर हीच पिके घ्यायचे. यातून त्याना नफा कमी आणि बरेचदा नुकसान व्हायचे. अशावेळी निराश न होता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे उसाचे पीक विदर्भ भूमीत घ्यावे, असा संकल्प करीत ‘बुडालो तरी आपण आणि तरलो तरी आपणच’ हा विचार करून राजेश यांनी ऊसशेतीचे नियोजन केले.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

शेतात ऊस पिकाची लागवड करीत दर्जेदार कांड्या, खत, फवारणी तसेच पाण्याचे नियोजन केले. राज्यातील ऊस उत्पादकांच्या शिबिराला उपस्थिती दर्शवून यातून पिकाचा अभ्यास केला. यामुळेच एका एकरात तब्बल १०२ टन विक्रमी उस उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली. यातून त्यांनी आत्महत्याग्रस्त आणि मानसिक, आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांपुढे आदर्शच निर्माण केला.

नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव

ऊस पिकासाठी कमी खर्चात जास्तीत जास्त पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. अस्मानी संकटाचा कुठलाच परिणाम या पिकावर होत नसल्याने हमखास उत्पन्न देणारे हे पीक राजेश यांच्या संपूर्ण ४० एकरात आहे. उसाचे विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी राजेश भगल यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संपूर्ण खर्च जाता एकरी ७० ते ८० हजारांचा नफा होत असल्याचे राजेश सांगतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन भगल यांनी शेतकऱ्यांना केले.

हेही वाचा: पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही; मात्र...

शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन ऊस शेतीला प्राधान्य द्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी कपाशी, तूर, सोयाबीन ही पिके बाद करून ऊस लागवडीकडे वळावे. या पिकाला निसर्गाचा कुठलाही धोका नाही. आजच्या घडीला हमखास उत्पन्न देणारे पीक ऊसच आहे. विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मानस उद्योग समून वरदान ठरला आहे. या समूहाचे विदर्भातील कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस सहज खरेदी करतात. त्यामुळे ऊसविक्रीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आत्महत्येचा विचार सोडा आणि उसाच्या शेतीकडे वळा.
- राजेश भगल, ऊस उत्पादक शेतकरी, आजनी, ता. सावनेर
loading image
go to top