esakal | पालिकेकडून फक्त घोषणांचाच महापूर, सोमवारपासून सुरू होणारे सेंटरही बंदच

बोलून बातमी शोधा

representative image

पालिकेकडून फक्त घोषणांचाच महापूर, सोमवारपासून सुरू होणारे सेंटरही बंदच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या पाचपावली सुतीकागृहात सोमवारपासून ७० ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा सुरू होणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले होते. परंतु, ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने पाचपावली सुतीकागृहासह केटीनगर रुग्णालयात बेडसाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रशासनासोबत चर्चेशिवाय महापौरांनी केलेल्या घोषणेमुळे ऑक्सिजनची आशा बाळगणाऱ्या बाधितांची दिशाभूल होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: भीतीमुळे खरंच ऑक्सिजनच्या पातळीत घट होतेय? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाले आहे. नागरिक हवालदिल झाली आहे. संकटाच्या काळात प्रशासनाकडूनही वैद्यकीय मदत मिळत नाही. प्रत्येक नागरिक स्वतःच संघर्ष करीत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनअभावी जीव जात असून प्रशासन व नेते बघ्याची भूमिका बजावत आहे. प्रत्येक मोहल्ला, वस्ती शोकात दिसून येत आहे. एकप्रकारे शहर उपचारासाठी तडफडणाऱ्यासाठी नरक ठरत आहे. आज शहरात ४० हजारावर रुग्ण घरीच औषधोपचार करीत आहेत. ऑक्सिजनची गरज पडण्याची शक्यता बघता नागरिक ऑक्सिजनयुक्त बेडची शोधाशोध करताना दिसून येत आहे. त्यातच सोमवारपासून ७० ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होणार असल्याचे वृत्त सोमवारी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले. महापौर दयाशंकर तिवारी यांनीच ही माहिती दिल्याने अनेकांनी यावर विश्वास ठेवला. परंतु, सोमवारी पाचपावली सुतीकागृहात ऑक्सिजन पोहोचले, परंतु चुकीच्या पत्त्यावर आल्याने परत गेल्याचे सूत्राने नमूद केले. महापालिका प्रशासनाकडे याबाबत विचारले असता सध्या ऑक्सिजनची मोठी टंचाई तसेच सिलिंडरचीही व्यवस्था नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. ऑक्सिजन सिलिंडरसाठी निविदा काढल्या असून उद्या उघडली जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे पाचपावली सुतीकागृहात तसेच केटीनगर रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था अद्याप तरी सुरू झाली नाही. एकूणच महापौरांनी काल दिलेली माहिती अन प्रशासनाची लाचारी बघता उभयतांमध्ये कोविडच्या संकट काळात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

ऑक्सिजनसाठी अधिकारी रांगेत -

ऑक्सिजनचा तुटवडा असून अधिकाऱ्यांनाही ऑक्सिजन प्रकल्पावर रांगेत उभे राहावे लागत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत ऑक्सिजनकरिता प्रकल्पाच्या ठिकाणी दोन ते चार तास बसून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. प्रकल्प संचालकांकडे विनवणी करावी लागत असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.

पाचपावली सुतीकागृहात ऑक्सिजन बेडसंबंधी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. परंतु ऑक्सिजनचे नियोजन झाल्याशिवाय बेडची सुविधा सुरू करता येणार नाही. ऑक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर पाचपावली सूतिकागृहासह केटीनगर रुग्णालयातही बेडची सुविधा उपलब्ध होईल. पाचपावली सूतिकागृहात ऑक्सिजन प्रकल्पाचे काम सुरू असून प्रत्यक्ष ऑक्सिजन मिळण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील.
- डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.