esakal | कुलींचे हालबेहाल! उत्पन्न थांबले अन् मदतही नाही; आता घरी खायचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Coolies

कुलींचे हालबेहाल! उत्पन्न थांबले अन् मदतही नाही; आता घरी खायचे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रवाशांच्या ओझ्यावरच कुलींच्या संसाराचा गाडा चालतो. परंतु, कोरोनाच्या भीतीने प्रवासी सामान उचलू देत नाही. दिवसभर थांबूनही हाती मिळकत पडत नाही. यामुळे कुलींचे हालबेहाल आहेत. संसाराचा गाडा खेचावा तरी कसा, हा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रवास टाळला जात आहे. परिणामी रेल्वे प्रवाशांची संख्या घटली आहे. आधीच गाड्यांची संख्या कमी, धावणाऱ्या रेल्वेतही पुरेसे प्रवासी नाही. त्याचा थेट परिणाम कुलींच्या उत्पन्नावर झाला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सुमारे दीडशे भारवाहक कार्यरत आहेत. संसर्गाच्या भीतीने अर्ध्याहून अधिक भारवाहक गावी परतले किंवा कामावर येणे थांबविले आहे. पर्याय नसल्याने सुमारे ७० हमाल अगदी जिवाची जोखीम स्वीकारून कामावर येत आहेत. रोज ठरलेल्या वेळी मोठ्या आशेने ते कामावर येतात. पण, प्रवाशांमध्ये कोरोनाची धास्ती असल्याने त्यांना सामानच उचलू दिले जात नाही. अगदी १२ तास थांबूनही अनेकांच्या हाती दमडीही पडत नाही. हिरमुसल्या चेहऱ्यानेच त्यांना घरी परतावे लागत आहे.

हेही वाचा: मित्रच निघाला मास्टरमाईंड, शिक्षकाला लुटणाऱ्या चौघांना अटक

कुटुंबांवर उपासमारीची वेळ -

गत लॉकडाउनमध्येही हमालांचे उत्पन्न पूर्णपणे थांबले होते. पण, त्यावेळी सामाजिक संस्था मोठ्या संख्येने मदतीसाठी पुढे आल्या होत्या. अडचणीत असणाऱ्या घटकांना किराणा किटचे वितरण करण्यात येत होते. या मदतीच्या बळावर अनेक कुटुंबांनी अडचणीचे दिवस पुढे ढकलले. रेल्वेशी संबंधित संस्था संघटनांकडून भारवाहकांना मोठी मदत झाली. ती संवेदनशीलता यंदा कुठेही दिसत नाही. मदत मिळत नसल्याने कुलींच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संपूर्ण वर्षच नुकसानदायी -

गतवर्षी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाउन लागला. तेव्हापासूनच कुलींच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पर्यटनासह धार्मिक सोहळे, सर्वप्रकारच्या कार्यक्रमांवर मर्यादा आहेत. अगदी वर्षभरच ही स्थिती राहिल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. गाठीला असणारे पैसे खर्चून कसेबसे दिवस ढकलणे सुरू असल्याचे कुलीबांधव सांगतात.

पहिल्या टाळेबंदीत रेल्वे प्रशासन, रेल्वे संघटना आणि सामाजिक संघटनांकडून मदत मिळाली होती. आता पुन्हा या अडचणीच्या मदतीची अपेक्षा आहे.
-अब्दूल माजीद, अध्यक्ष मध्य रेल्वे भारवाहक संघटना
loading image