esakal | पर्यटकांनो, चला नागझिऱ्याला जाऊया! 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले; पशू,पक्ष्यांचा आवाज कानी घुमणार
sakal

बोलून बातमी शोधा

nagzira forest will open from first november

आजच्या धकाधकीच्या जगात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्‍वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक राहावे लागले

पर्यटकांनो, चला नागझिऱ्याला जाऊया! 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले; पशू,पक्ष्यांचा आवाज कानी घुमणार

sakal_logo
By
चित्रा कापसे

तिरोडा (जि. नागपूर) :  राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेला तालुक्‍यातील नागझिरा अभयारण्य 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुला होणार आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीपासून आसुसलेल्या पर्यटकांना लवकरच पर्यटकांना आनंद लुटता येणार आहे. 

आजच्या धकाधकीच्या जगात माणसाचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशावेळी मोकळा श्‍वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून सहलीचा बेतही आखला जातो. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेकांना घरीच लॉक राहावे लागले. मात्र, त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नागझिरा अभयारण्यात त्यांना पर्यटनाचा बेत आखता येणार आहे. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही होतो. फार वर्षांपूर्वी या जंगलात हत्तीचे वास्तव्य होते. पाण्याचे झरेसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने या अभयारण्याला नागझिरा असे नाव पडले. 

या अभयारण्यात अनेक पशुपक्षी, झाडे बघायला मिळतात. हे अभयारण्य गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या मधोमध असून 152.81 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याची विशेषतः म्हणजे यामध्ये विद्युत पुरवठा अजिबात नाही. हे जंगल नैसर्गिकच राखले गेले आहे. यात 200 पक्षांची नोंद असून वाघ, बिबट्या, रानडुक्कर, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, चौसिंगा, नीलगा, चितळ, सांभर असे असंख्य पशू आहेत. सर्पगरुड, मत्स्यगरुड, टकाचोर, नवरंग, कोतवाल, खाटीक, राखीधनेरा आदी अनेक पक्षी अभयारण्यात उडताना दिसतात. 

अभयारण्यात प्रवेश करताच सांबर, चितळ, हरिण, नीलगाय, रानगवा, अस्वल आदी प्राणी रस्त्याच्या दुतर्फा मुक्तपणे संचार करताना दिसतात. आजूबाजूला माकडे फांद्यावर उड्या मारत असताना पर्यटकांचे मन मोहून टाकतात. पावलापावलावर दिसणारी हरणे, माकडे त्याचप्रमाणे राज्यपक्षी हरियाल, हळद्या, निलपंखी, स्वर्गीयनर्तक, नवरंगी, तुरेवाला सर्प गरुड, व्हाइट आईड बझार्ड यासारखे शिकारी पक्षी बघायला मिळतात. अनेक प्रकारची फुलपाखरे निरनिराळ्या प्रकारची कोळी, पट्टेवाला वाघ, अस्वले, रानकुत्रे पाहायला मिळतात.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

पर्यटकांनी असे जावे...

या अभयारण्याच्या आसपास आवर्जून भेट द्यावी, असे नवीन नागझिरा, नवेगावबांध जलाशय, चोरखमारा जलाशय, अंधारबन, नागदेव पहाडी, कोसमतोंडी त्याचप्रमाणे काही अंतरावर कान्हा प्रकल्प,पेंच प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा दुवा आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून 22 किलोमीटर पिटेझरी गेटवरून या अभयारण्यात प्रवेश करता येतो. तिरोडा येथून 12 किलोमीटर अंतरावरून या अभयारण्यात प्रवेश करता येतो.

संपादन - अथर्व महांकाळ