esakal | नक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ, बांधकामावरील मजुरांनाही मारहाण

बोलून बातमी शोधा

naxal
नक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ, बांधकामावरील मजुरांनाही मारहाण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरी तालुक्‍यात येत असलेल्या मेडपल्ली ते तुमीरकसा येथे 6 किमी अंतराचे रस्ता बांधकाम सुरू असून रविवार (ता. 25) मध्यरात्रीच्या सुमारास 15 ते 20 नक्षलवाद्यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन बांधकामावरील वाहने पेटवून दिली. त्यानंतर नक्षली बॅनर लावून कामावरील मजुरांना धमकावून गेल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: पेटंट सादर करण्यात विदर्भातील विद्यापीठ पिछाडीवर, 'अभिमत' मात्र आघाडीवर

मेडपल्ली ते तुमीरकसा येथील मार्गाचे 6 किमी अंतराचे बांधकाम छत्तीसगड येथील श्‍यामल मंडल यांच्याद्वारे सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी मुरूम लागत असल्याने कंत्राटदाराने भाडेतत्त्वावर जाळपोळीच्या एक दिवसआधीच ट्रॅक्‍टर व इतर वाहने बोलावली होती. ही वाहने गावातच रस्त्यालगत उभी होती. त्याच वाहनांची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या रस्त्याचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू होते. मात्र, अचानक रात्री नक्षलवाद्यांनी येऊन कामावरील कर्मचारी व मजुरांना मारहाण करत धमकी देऊन ट्रॅक्‍टर, पाण्याची टॅंकर आणि ब्लेड ट्रॅक्‍टर या वाहनांना आग लावली. या आगीत ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. नक्षल्यांनी जाळपोळ केल्याने पुन्हा या परिसरात नक्षलवाद्यांची दहशत निर्माण झाली आहे.

दरम्यान, नक्षल्यांनी येथे लावलेल्या बॅनरमध्ये आज 26 एप्रिल रोजी भारत बंद करण्याची दिली हाक आहे. समाधान नावाने सरकारने आखलेल्या प्रतीक्रांतीकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या प्रहर दमन अभियानाच्या विरोधात एप्रिल 2021 महिनाभर प्रचार आणि जनआंदोलन उभे करून आज एप्रिलला या दमन मोहिमेच्या विरोधात भारत बंद करा, अशी हाक बॅनरद्वारे देण्यात आली आहे. याशिवाय नक्षल चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी युवक युवतींनी नवजनवादी भारत निर्माण करण्यासाठी पीएलजीएमध्ये भर्ती व्हावे, असे आवाहन करण्यात येऊन पेरमिली एरिया कमेटी, भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असे बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा: वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी

आदल्या दिवशी आढळले बॅनर -

अहेरी तालुक्‍यातील आलापल्ली-पेरमिली मार्गावर शनिवार (ता. 24) सकाळी नक्षली बॅनर आढळून आले. त्यावर नक्षल्यांनी दिल्लीत सुरू असलेले कृषीबिलविरोधातील आंदोलन निरंतर सुरू ठेवण्याची मागणी केली असून सरकारचा निषेध केला आहे. आलापल्ली-पेरमिली मार्गावर रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी बॅनर बांधल्याचे शनिवारी सकाळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. या बॅनरवर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याची मागणी केली असून 26 एप्रिल रोजी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे.