नवीन वर्ष विद्यापीठासाठी घेऊन येणार आनंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • विद्यापीठाला मिळणार नवे कुलसचिव 
  • मुलाखती जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 
  • 12 सप्टेंबर ते 5 ऑक्‍टोबरपर्यंत 24 अर्ज 
  • डॉ. नीरज खटी पद स्वीकारण्यास असमर्थ 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर डॉ. नीरज खटी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तांत्रिक कारण देत पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. विद्यापीठाने दुसऱ्याच दिवशी कुलसचिवपदासाठी नव्याने जाहिरात दिली. आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाला नवे कुलसचिव मिळणार असल्याची माहिती आहे. 12 सप्टेंबर ते 5 ऑक्‍टोबरदरम्यान 24 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

जाणून घ्या - व्यावसायिक विकास संस्थेचे का झाले पुन्हा डायट! 

विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी सात सप्टेंबरला मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर लगेच नावाची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, चार दिवसानंतरही नावाची घोषणा न केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. 12 सप्टेंबरला डॉ. नीरज खटींची निवड करण्यात आली. मात्र, कुलसचिवपदावर निवड झालेले डॉ. खटी काही महिन्यांपूर्वीच डी. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीत (एलआयटी) रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी रुजू झाले. त्यांनी "लिन'साठी विद्यापीठाकडे अर्ज केला. मात्र, त्यांचा "प्रोबेशन' कालावधी पूर्ण झाला नसल्याने त्यांना "लिन' देण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी डॉ. खटी यांचा अर्ज फेटाळला. 

महत्त्वाची बातमी - संशोधन करताय? मग हे वाचाच

यातूनच डॉ. खटी यांनी कुलसचिवपद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकाराने विद्यापीठाला नव्याने जाहिरात द्यावी लागली. पाच ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. जवळपास 24 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. मात्र, सहा ऑक्‍टोबरपासून विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने मुलाखत घेता येणे शक्‍य नसल्याने ती संपताच लवकरात लवकर मुलाखत घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. 

अधिक वाचा -  महाविद्यालय ते परीक्षेसाठी नेमा "आययूएमएस' 

आचारसंहिता संपून महिना झाला तरी मुलाखत झाली नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कुलसचिवपदासाठी मुलाखत घेण्यात येईल. यानंतर कुलगुरूंमार्फत नव्या कुलसचिवांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठाला नियमित कुलसचिव मिळालेला नाही. त्यामुळे प्रभारींवर कुलसचिवपदाचा भार आहे. 

अनेकांचे स्वप्न भंगणार

विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी गेल्या वर्षभरापासून अनेकांनी फिल्डिंग लावली होती. यामुळे कुलगुरूंवर राजकीय दबाव निर्माण करीत कुलसचिवपदावर निवड झालेले कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना "लिन'चे कारण देत राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे निवड होऊनही नव्याने कुलसचिवपदाची जाहिरात देण्याची नामुष्की ओढवली. मात्र, आता राज्यात सत्तांतर झाले असल्याने अनेक उमेदवारांचे स्वप्न भंगणार असल्याचे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New registrar will be elected