संशोधन करताय? मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • प्राध्यापकांना मिळणार संशोधनासाठी निधी 
  • विद्यापीठाच्या शिक्षण कल्याण निधीमध्ये नवी तरतूद 
  • विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांनाही आर्थिक मदत 
  • प्रस्ताव विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडे सादर करावा लागणार 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामधील प्राध्यापकांना आता संशोधन आणि देश-विदेशातील चर्चासत्रांमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षक कल्याण निधीमधून पैसे दिले जाणार आहेत. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सिनेट बैठकीत सदस्य डॉ. चिमणकर यांनी हा विषय मांडून चर्चासत्र आणि संशोधनासाठी निधी देण्याची मागणी केली होती. 

विद्यापीठात "करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम'अंतर्गत दर्जा वाढवून घेण्यासाठी प्राध्यापकांना विविध प्रकारचे चर्चासत्र, परिषदा आणि कार्यशाळांमध्ये सहभागी व्हावे लागते. यासाठी जवळपास सर्वच प्राध्यापक आपल्या खिशातून पैसे खर्च करीत असतात. अनेकदा संशोधनासाठीही देश-विदेशात जावे लागते. त्यामध्येही बराच खर्च होत असतो. विद्यापीठातील विभागांमध्ये शिकवित असलेल्या प्राध्यापकांचे विविध विषयांवर संशोधन सुरू असते. यासह देशविदेशांमध्ये होणाऱ्या चर्चासत्रांमध्येही प्राध्यापक भाग घेत असतात. 

जाणून घ्या - आनंदवार्ता! आता दीड महिन्यात निकाल

प्राध्यापक असताना आपल्या ज्ञानामध्ये अधिकची भर पडावी म्हणून प्राध्यापकांचे हे कार्य सुरू असते. मात्र, यासाठी विद्यापीठाकडून कुठलीही आर्थिक मदत होत नसल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजींचा सूर उमटायचा. त्यामुळे मागील महिन्यात झालेल्या विधिसभेच्या बैठकीमध्ये प्राध्यापकांना चर्चासत्र किंवा संशोधनासाठी बाहेर जाणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली. विधीसभा सदस्य प्रा. चिमणकर यांनी तसा प्रस्तावही दिला होता. 

त्यांनी संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनाही अशाप्रकारचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी पुढे आली होती. मात्र, यावर विद्यापीठाने शिक्षण कल्याण निधीमध्ये अशाप्रकारची सोय करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यावर आता विद्यापीठाने अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांना संशोधनासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. यासह विविध चर्चासत्रांमध्ये सहभागी होणाऱ्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे. 

कसंकाय बुवा? - मराठी शाळा म्हणतेय, मला वाचवा होऽऽ

प्रस्ताव पाठवणे गरजेचे

प्राध्यापकांना संशोधन करण्यासाठी आणि चर्चासत्र, कार्यशाळेसाठी बाहेर जायचे असल्यास प्रस्ताव विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडे सादर करावा लागणार आहे. त्यातील प्रस्ताव हे एका विशेष समितीपुढे जाणार आहेत. प्रस्ताव बघून सर्वांत महत्त्वाच्या प्रस्तावांची निवड केली जाणार आहे. यासाठी हजारांच्या आर्थिक निधीची तरतूद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रस्ताव मोठा असल्यास त्यावरही विचार होणार आहे. या निर्णयामुळे प्राध्यापकांच्या संशोधन आणि चर्चासत्रात सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार आहे. 

दर्जेदार संशोधन होईल
शिक्षण कल्याण निधीच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या संशोधनाला मदत होणार आहे. यासाठी आलेल्या प्रस्तावावर विचार करून मदत केली जाणार आहे. यातून दर्जेदार संशोधन होईल असा विश्‍वास आहे. 
- डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professors will receive funding for research