आश्‍चर्य...दृष्टी नसताना केले वृत्तवाचन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

वृत्त विभागाच्या वतीने सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी प्रसारित होणारे बातमीपत्र दृष्टिहीन दिव्यांग शिक्षकाने वाचले. त्यांचे नाव रघुवीर कुरमी. आकाशवाणीच्या विविध भारती स्टुडिओतून या बातमीपत्राचे वाचन करण्यात आले.

नागपूर : पाचशे बारा पूर्णांक आठ मीटर म्हणजेच 586 किलो हर्टसवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण कार्यालयाच्या अंतर्गत नागपूर येथील आकाशवाणीच्या वृत्त विभागात मंगळवारी (ता. तीन) जागतिक दिव्यांग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 

येथील वृत्त विभागाच्या वतीने सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी प्रसारित होणारे बातमीपत्र दृष्टिहीन दिव्यांग शिक्षकाने वाचले. त्यांचे नाव रघुवीर कुरमी. आकाशवाणीच्या विविध भारती स्टुडिओतून या बातमीपत्राचे वाचन करण्यात आले. आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग बांधवांमध्ये एकप्रकारचा आत्मविश्‍वास निर्माण व्हावा हाच आहे. ब्रेललिपीच्या साहाय्याने बातमीपत्र वाचताना कुरमी यांनी अतिशय काळजी घेतली.

हेही वाचा : दिव्यांगांना झिजवावे लागतात कार्यालयाचे उंबरठे 

दक्षिण अंबाझरी मार्गावर ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये रघुवीर कुरमी शिक्षक आहेत. सदर बातमीपत्र वाचण्यापूर्वी ते त्यांनी ब्रेल लिपीत तयार केले. त्याची एकदा तालीम केली. यानंतर त्यांनी हे बातमीपत्र न अडखळता वाचले. ही अभिनव संकल्पना आकाशवाणी वृत्त विभागाच्या सहायक संचालिका गौरी मराठे, मनोज सोनोने, धनंजय वानखेडे यांच्यासह नागपूर आकाशवाणीचे केंद्र संचालक प्रवीण कावडे, कार्यक्रम विभागाचे सहायक संचालक डॉ. हरीश पाराशर यांनी मूर्त रूप दिले. यावेळी आकाशवाणीच्या वृत्त विभागातील उद्‌घोषक अशोक जांभूळकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

आकाशवाणीचा पहिला दिवस 

16 जुलै 1948 रोजी आकाशवाणीच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवातही अभिनव उपक्रमाने झाली होती. सकाळी 6.30 ला मास्टर कृष्णराव यांच्या "वंदेमातरम्‌' गायनाने नागपूर आकाशवाणीचा शुभारंभ झाला. 6.45 वाजता भारत सरकारचे तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वल्लभभाई पटेल यांच्या संदेश वाचनानंतर राज्यपाल एम. पकवासा यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. सायंकाळी 7.50 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "खंजिरी भजन' कार्यक्रमाचे "लाइव्ह ब्रॉडकॉस्टिंग' केले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newsletter read by a visually impaired teacher