...अन् उरले फक्त सांगाडे; मृतदेहांची ओळख सुद्धा पटली नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nine killed in road mishap at Chandrapur District

...अन् उरले फक्त सांगाडे; मृतदेहांची ओळख सुद्धा पटली नाही

चंद्रपूर : लाकूड तोडून कुटुंबाच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करणाऱ्या मजुरांना लाकूडच जिवावर उठेल, असे स्वप्नातही वाटले नाही. परंतु, नियतीने डाव साधला आणि आयुष्याची राखरांगोळी केली. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले. कोणाच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आणणारा अपघात गुरुवारी मध्यरात्री घडला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच अख्खं गाव निःशब्द झाले. (Nine killed in road mishap at Chandrapur District)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अजयपूरजवळ गुरुवारी मध्यरात्री लाकूड घेऊन जाणार ट्रक आणि डिझेलच्या टॅंकरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरने पेट घेतला. पाहता पाहता आगीने ट्रकलाही आपल्या कवेत घेतले. ट्रकमध्ये चालकासह सहा मजूर होते. मात्र, अपघातानंतर त्यांना बाहेर पडण्यासाठी क्षणाचाही वेळ मिळाला नाही. यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली गावातील पाच मजुरांचा समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर भडकलेल्या ज्वाळा आजूबाजूच्या गावातील नागरिकांना दिसल्या. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ते पोहोचल्यानंतर पाहतच राहिले. कारण, त्यांना भडकलेल्या आगीतून केवळ मजुरांच्या आर्त किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत नऊ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू (Nine killed in road mishap) झाला. आग शांत झाली तेव्हा उरले फक्त त्यांचे सांगाडे.

हेही वाचा: इंद्राणी मुखर्जी म्हणाली, भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा; कारण...

अशी आहेत मृतांची नावे

प्रशांत नगराळे (३३), मंगेश टिपले (३०), भय्यालाल परचाके (२४), बाळकृष्ण तेलंग (५७) व साईनाथ कोडापे (४०) सर्व राहणार लावारी, अजय डोंगरे (३०, रा. बल्लारपूर), संदीप आत्राम (२२, कोठारी), संदीप बापूजी कोडापे (२२, रा. तोहोगाव) व अजय पाटील (रा. वर्धा) अशी मृतांची नावे आहेत.

उरले फक्त सांगाडे

सर्व मृत मजूर लाकूड तोडीच्या कामाला जायचे. हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यांच्या कुटुंबाचा गाडा याच कामावर चालायचा. परंतु, काळाने डाव साधला आणि निष्पाप मजुरांचा जीव गेला. यातील अनेकांची कुटुंबे आता उघड्यावर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु, मजुरांचे केवळ सांगाडेच शिल्लक असल्याने ओळख सुद्धा पटली नाही.

मृतदेह गावकऱ्यांना मिळाले नाही

गावातील पाचही मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात निर्णय गावकऱ्यांनी घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत शासकीय सोपस्कार पार पडल्याने मृतदेह गावकऱ्यांना मिळाले नव्हते. दुसरीकडे अख्खं लावारी हादरून गेले. दिवसभर गावात चूलसुद्धा पेटली नाही. सर्वत्र स्मशान शांतता आणि चिंताग्रस्त चेहरे गावाच्या वेशीकडे मृतदेह घेऊन येणाऱ्या वाहनाची प्रतीक्षा करीत होते.

Web Title: Nine Killed In Road Mishap Chandrapur District Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top