सिंचनासाठी मुबलक पाणी, पण कालव्यांच्या सफाईची बोंब

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 22 November 2020

पश्‍चिम विदर्भात यंदा पावसाने सरासरी ओलांडत जलसाठ्यात वाढ केली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मोठ्या व मध्यम धरणांसह लघू प्रकल्पांनी शंभर टक्‍क्‍यांवर जलपातळी ओलांडली. परिणामी खबरदारीसाठी धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला.

अमरावती : यंदा रब्बी हंगामात पिकांना पूर्ण पाच पाळ्या सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. सिंचनासाठी पाणी मागा, असे आवाहन खुद्द जलसंपदा विभागाकडून करण्यात येत असून कालव्यांच्या साफसफाईकडे मात्र दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. पश्‍चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत.

हेही वाचा - VIRAL AUDIO : प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलांनी केले...

पश्‍चिम विदर्भात यंदा पावसाने सरासरी ओलांडत जलसाठ्यात वाढ केली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मोठ्या व मध्यम धरणांसह लघू प्रकल्पांनी शंभर टक्‍क्‍यांवर जलपातळी ओलांडली. परिणामी खबरदारीसाठी धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा या मोठ्या धरणातून अजूनही विसर्ग सुरू आहे. विभागात तीनही प्रकारच्या प्रकल्पांतील एकूण जलसाठा 3033 दलघमी ( 92 टक्के ) झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटण्यासोबतच उन्हाळ्यातही मुबलक जलसाठा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा - आता मागेल त्याला काम, सुटणार रोजगाराचा मोठा प्रश्न

गतवर्षी धरणातील जलसाठ्याच्या टंचाईमुळे सिंचनाच्या पाण्यात कपात करण्याची वेळ आली होती. पाच ऐवजी दोन किंवा तीन पाळ्या पाणी सिंचनासाठी मिळू शकले. यंदा त्याउलट स्थिती आहे. धरणांमध्ये मुबलक साठा आहे. पूर्ण पाच पाळ्या पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. डावा व उजव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून मात्र जलसंपदा विभागाच्या आवाहनास हवा तसा प्रतिसाद मात्र नाही. गहू व हरभरा या रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी देण्यात येणार असले तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे शेतातील विहिरी व बोअरवेलमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यांनी या आवाहनाकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले असले तरी कालवे व पाटचऱ्यांची साफसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. कालवे व पाटचऱ्या झाडाझुडपांनी भरली आहेत. काही ठिकाणी ती फुटली आहेत. त्यातून पाणी वाया जाण्याचीच शक्यता अधिक आहे, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे पाणी असले व सिंचनाचे नियोजन असले तरी देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी सोडले तरी अखेरच्या शेतकऱ्यांच्या (टेलवरील) शेतात ते पोहोचलेच असे नियोजन नाही.

हेही वाचा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनसंपर्क कक्ष गेला तरी कुठे?

विभागात 92 टक्के जलसाठा -
अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत 1353 दलघमी (96 टक्के), 25 मध्यम प्रकल्पांत 674 दलघमी ( 92 टक्के) व 477 लघू प्रकल्पांत 1005 दलघमी ( 87 टक्के) जलसाठा यंदा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no canal cleaning in amravati