आता मागेल त्याला काम, सुटणार रोजगाराचा मोठा प्रश्न

राज इंगळे
Sunday, 22 November 2020

मेळघाटातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर ठिकाणी रोजगारासाठी जातात. मेळघाटात मजुरांची संख्या फार मोठी आहे. याठिकाणी मजुरांच्या हाताला वर्षभरात केवळ चार महिनेच काम असते.

अचलपूर (अमरावती ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर बाहेर ठिकाणी कामाला जात आहेत. मेळघाटातून कुठलाही मजूर बाहेर ठिकाणी कामाला जाऊ नये, यासाठी मनेरेगातून मजुरांना मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मेळघाटातील नागरिकांनी कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्‍यकता नसल्याची माहिती चिखलदरा येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली. त्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे जाऊन नमुना चार भरून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही वाचा - माणुसकी संपली! दुसऱ्यांचे सोडा होऽऽ जखमी रखवालदाराची पत्नी आणि मुलांनाच नाही चिंता,...

मेळघाटातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर ठिकाणी रोजगारासाठी जातात. मेळघाटात मजुरांची संख्या फार मोठी आहे. याठिकाणी मजुरांच्या हाताला वर्षभरात केवळ चार महिनेच काम असते. त्यानंतर मात्र मजुरांना बाहेर ठिकाणी रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मजुरांच्या हाताला कामे नाही. अशावेळी मजुरांची होणारी परवड थांबविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घेत कामाचे नियोजन करत गाव स्तरावर कामे उपलब्ध करून देण्यासाठी मजुरांना गावातील ग्रामपंचायतकडे नमुना चार भरून देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी मदत होईल. 

हेही वाचा - आपणास पण देवमित्र व्हायचे का? ‘देवाचा मित्र’ या...

तालुक्‍यात सध्या कामे नसल्याने दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात मजुरांनी पलायन केले. शासनाकडून वेळेवर कामे उपलब्ध झाले नसल्याने मोठ्या प्रमाणात मजूर बाहेर ठिकाणी कामाला गेले. यावर उपाय म्हणून चिखलदरा येथील गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामसेवकांना गावामध्ये कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा - VIRAL AUDIO : प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलांनी केले फोन, मतदारांचे त्यांनाच उलट सवाल

मेळघाटात कामाअभावी मजूर बाहेरगावी जात आहे. या बाबीचा विचार करून मजुरांना वेळेवर काम उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मागेल त्याला काम मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे जाऊन नमुना चार भरून देणे गरजेचे आहे.
- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BDO prakash pol will organized employment program for tribal people