जयंतीदिनी बापूंची अवहेलना; नशिबी प्लॅस्टिकचे आवरण, स्मारकाकडे कोणी फिरकलेच नाही

No one turned to Mahatma Gandhi memorial
No one turned to Mahatma Gandhi memorial

लाखनी (जि. भंडारा) : जगाला ज्यांनी सत्य व अहिंसेची शिकवण दिली व जे आपले राष्ट्रपीता आहेत अशा महापुरुषाच्या चरणी जयंतीदिनी एकही फूल अर्पण करण्यात आले नाही. फूल आणि हार तर सोडाच त्यांच्या स्मारकाची साधी स्वच्छतादेखील करण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाही. हा संतापजनक प्रकार येथील महात्मा गांधी स्मारकात पुढे आला.

२ ऑक्टोबर, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची जयंती. या दिवशी   सरकारी सुटी असते. गांधीजींच्या जयंतीदिनी शासन-प्रशासनाद्वारे देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, लाखनीत वेगळाच प्रकार उघडकीस आला. लाखनी येथे गांधी स्मारक निधीतून राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यात आले.

मधल्या काळात या स्मारकाचा वाद न्यायालयात पोहोचला. तेव्हापासूनच येथील पुतळ्याच्या नशिबी प्लॅस्टिकचे आवरण आले. गत अनेक वर्षांपासून या आवरणात गांधीजींचा श्वास गुदमरतोय पण याची चिंता कुणालाही नसल्याचे गांधी जयंतीला सिद्ध झाले.

स्थानिक प्रशासनाने किमान जयंती व पुण्यतिथीला या स्मारकाची स्वच्छता करून कार्यक्रम घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनाही याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. तहसीलदार मल्लिक विराणी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते सुटीवर आहेत. तर प्रभारी तहसीलदारांचे या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष गेले नसावे.

स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. विकास गभने यांनी न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेली. तसेच एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रस्यावर उतरणाऱ्या समाजसेवी संघटना देखील बापूंच्या स्मारकाकडे भटकले नाही. तर मग अवहेलनाच करायची असेल तर महापुरुषांचे पुतळे उभारायचे कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

वाद न्यायप्रविष्ट
महात्मा गांधी स्मारकाचा वाद न्यायालयात आहे. जिल्हा न्यायालयाने श्री पुरुषोत्तम नागपुरे यांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर स्थगनादेश दिला आहे. त्यामुळे आम्ही महात्मा गांधींच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही.
- डाॅ. विकास गभने
अध्यक्ष, महात्मा गांधी स्मारक समिती, लाखनी

मी सुटीवर होतो
मला कोरोनाची लागण झाल्याने सुटीवर होतो. कामाचा प्रभार श्री. मडावी यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी गांधी जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे अपेक्षित होते.
- मल्लिक विराणी,
तहसीलदार

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com