हाताला काम नाही, कारखाने नाहीत, करायचे काय?

 कन्हान ः कुलूपबंद  कंपन्या.
कन्हान ः कुलूपबंद कंपन्या.
Updated on

टेकाडी (जि.नागपूर) ः पारशिवनी तालुक्‍यात उद्यमशीलतेला चालना मिळण्याच्या आशेने स्थानीय युवावर्ग मोठ्या प्रमाणात मतदानप्रक्रियेत सहभागी होतो. मताधिक्‍याने निवडून येणारा जनप्रतिनिधी तालुक्‍यात लघू व मोठे उद्योग बहरविण्यासाठी प्रयत्न करेल, ही अपेक्षा असते. मात्र, क्षेत्रात कुठलाही उद्योग तग धरण्याच्या धर्तीवर प्रयत्न होत नसल्याने बेरोजगारीचे सावट झेलणार युवा तूर्तास हतबल झालेला आहे. क्षेत्रातील कुलूपबंद कारखान्यांसोबत छोट्या मोठ्या कुठल्याही उद्योजकांना इथे भरारी घेण्यास आधार मिळत नसल्याने कन्हानचे कुलूपबंद कारखाने उघडेचिना! बेरोजगारीची जंग संपेचिना, अशी हतबलता युवावर्गाच्या वाट्याला आली आहे.

उद्योगांना चालना देणारी यंत्रणा निद्रावस्थेत
कन्हान शहराने विकसनशील शहर म्हणून ओळख होती. 168 हेक्‍टर 68 आर जागा कन्हान नगर परिषदेंतर्गत औद्योगिक क्रांतीसाठी काबीज आहे. सभोवताल समृद्ध अशा 30 गावांचा ग्रामीण भाग असल्याने शहराला उद्यमशीलतेसाठी वाव आहे. तालुक्‍याला एमआयडीसीची भरभराट न झाल्याने युवकांच्या मनात शल्य निर्माण झाले आहे. तालुक्‍यासह कन्हान शहरात नव्याने उद्योजकांना मार्गदर्शन व आर्थिक मदतीचा हात देणारी यंत्रणा चिरनिद्रेत असल्याने उद्योग आपला व्याप वाढवण्यास हतबल ठरते. शासनाचे स्वयंरोजगराचे धोरण तयार असले तरी त्यावर काम करणारी यंत्रणा मात्र बिनबुडाची असल्याने स्वयंरोजगारप्रणालीदेखील क्षेत्रात मागासलेली आहे. नवीन उद्योजकांचे पालकत्व असलेले जिल्हा उद्योग केंद्र काय भूमिका पार पाडते, हेही पाहण्यासारखे असते. जिल्हा उद्योग केंद्राकडून योजनांचा प्रसार व प्रचार कुठला उद्योग करावा, कुठला करू नये, याची माहिती देणारी यंत्रणा जिल्हा ते तालुकास्तरावर योग्यरीत्या पार पाडल्यास नव्या उद्योजकांना मदत होईल.

वार्षिक कर एक कोटी
कन्हान नदीच्या काठावर वसलेले शहर, रेल्वे लाइन, क्षेत्रातील गौण खनिजे एवढे असताना उद्योजकांना आपले उद्योग नव्याने क्षेत्रात उभारण्यासाठी इच्छा व्यक्त न होणे ही शोकांतिका आहे. भूतकाळात क्षेत्राला मोठ्या स्वरूपात रोजगार निर्माण करून देणारी "ब्रुक बॉण्ड' या एकाच चहा कंपनीचा वार्षिक कर एक कोटीच्या घरात तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाला जात होता. भूतकाळात बंद झालेले कारखाने वर्तमानात सुरळीत असते, तर रोजगाराची क्षमता परिसरात नक्कीच वाढून शहर विकसनशील शहरात मोजले गेले असते.


721 गावांचा समावेश
25 किमी क्षेत्र मेट्रोरिजनअंतर्गत विकसित केला जाणार आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्‍यांतील एकूण 721 गावांचा समावेश असल्याने साधरणात: 37 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून येथील मुबलक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यातच कन्हान शहरातून टेकाडी शिवारापर्यंत मेट्रो धाव घेणार आहे. त्यामुळे पारशिवनी तालुका मुख्य धारेत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com