ना काही काम, त्यात पर्यटकांनी दाखवली पाठ; मग कमलापूरच्या हत्तींचे करायचे तरी काय? 

मिलिंद उमरे 
Saturday, 11 July 2020

कमलापूर या निसर्गरम्य परिसरात व पातानील येथे काही हत्ती ठेवण्यात आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी पर्यटक येऊ लागले. त्यामुळे हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र, मध्यंतरी नक्षलवाद्यांनी येथील सौंदर्यीकरणाची तोडफोड केली. तेव्हा भीतीमुळे पर्यटक येईनासे झाले.

गडचिरोली : कधीकाळी ब्रिटिशांच्या राज्यात सेवा देणाऱ्या हत्तींसाठी निर्माण झालेले जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प मागील काही महिन्यांत एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत होते. पण, या पर्यटनस्थळावर नक्षलवाद्यांची वक्रदृष्टी फिरली. त्यांनी येथे तोडफोड केल्यावर येथील पर्यटकांची गर्दी ओसरली. सोबतच काही दिवसांपूर्वी येथे "आदित्य' नावाच्या बालहत्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता उर्वरित हत्तींचे काय करायचे, हा प्रश्‍न वनविभागापुढे निर्माण झाला आहे. 

उच्च दर्जाच्या सागवानसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मिळविण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने आलापल्ली येथे मोठे काष्ठ आगार निर्माण केले होते. त्या काळात हत्तींद्वारे सागवान व इतर वृक्षांचे महाकाय ओंडके वाहनात ठेवणे व इतर ठिकाणी नेणे आदी कामे करण्यात येत होती. त्यासाठी कमलापूर परिसरात खास हत्ती ठेवण्यात येत होते. पण, स्वातंत्र्यानंतर नवनव्या तंत्रज्ञानाच्या युगात येथे यंत्रांद्वारे काम सुरू झाले. त्यामुळे खरेतर हे हत्ती बेरोजगार झाले होते. तरीही माहूत त्यांना प्रशिक्षित करून छोटी, मोठी कामे करून घ्यायचे. 

कमलापूर या निसर्गरम्य परिसरात व पातानील येथे काही हत्ती ठेवण्यात आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी पर्यटक येऊ लागले. त्यामुळे हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र, मध्यंतरी नक्षलवाद्यांनी येथील सौंदर्यीकरणाची तोडफोड केली. तेव्हा भीतीमुळे पर्यटक येईनासे झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी येथील चार वर्षांचा आदित्य नावाचा हत्ती तलावात फसला होता. त्याला महत्प्रयासानंतर बाहेर काढण्यात आले. पण, त्याची प्रकृती बिघडत गेली व शेवटी त्याचा मृत्यू झाला. येथे असलेले हत्ती माणसाळलेले असले, तरी मागील काही वर्षांपासून या हत्तींवर माहुतांनी बसणे बंद केले आहे. प्राणी संरक्षण कायद्यामुळे वन्यजीवांना आता प्रशिक्षित करता येत नाही. या हत्तींना सकाळी गूळ, भात असे खाद्य देऊन जंगलात सोडले जाते. त्यानंतर ते जंगलात फिरून आपल्या मर्जीने परत येतात. त्यांचे पाळीव प्राण्यांप्रमाणे प्रशिक्षण होत नसल्याने हे हत्ती हळूहळू रानटी होण्याची शक्‍यता आहे. शिवाय आता त्यांना नक्‍की कशासाठी उपयोगात आणायचे, हे ठरविण्याची गरज आहे. 

अवश्य वाचा- ताई थांब जाऊ नको.... स्वराजची शेवटची आर्त हाक 

एकतर त्यांना पूर्णपणे पाळीव हत्तींप्रमाणे प्रशिक्षित करावे लागेल किंवा जिथे हत्तींचा उपयोग अद्यापही होतो तिथे पाठवावे लागेल. हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी येथील माहुतांना आधी विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पण, त्या दिशेने अद्याप कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

अवश्य पहा-  Video : `बसंती`साठी विरू चढला टॉवरवर....

कमलापूर येथे असलेल्या हत्तींबद्दल गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. मागील तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या वाढताना दिसत आहे. सोबतच मानव-वन्यजीव संघर्षही वाढत आहे. त्यामुळे या हत्तींना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचा उपयोग वाघांचा माग काढण्यासाठी व मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी करता येऊ शकेल. 
-किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ, महाराष्ट्र 

संपादन - राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No work, no tourists; So what to do with the elephants of Kamalapur?