चोरट्यांची वाढली हिंमत, आता पोलिसांचे घरही राहिले नाही सुरक्षित! 

संतोष ताकपिरे 
Friday, 2 October 2020

गुरुवारी (ता. एक) सकाळच्या सुमारास घरफोडीची घटना उघडकीस आली. महादेव परगणे (वय ३५) हे शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. रात्रपाळीत ड्युटीवर ते तैनात असल्याने पत्नी नातेवाइकांकडे गेली होती.

अमरावती ः शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून सामान्य जनता भयभीत आहे. आयुष्यभर कमावलेली मिळकत घरात सुरक्षित राहणार की नाही याची चिंता त्यांना सतावत आहे. या चोरट्यांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता पोलिसांच्या घरांनाही आपले सहज लक्ष्य करीत आहे. पोलिसांची घरेही आता सुरक्षित राहिलेली नाहीत. शहरातील साईश्रद्धा कॉलनीत राहणाऱ्या पोलिस शिपायाचे घर फोडून चोरट्याने तीन लाखांचा ऐवज लंपास केला. नांदगावपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

गुरुवारी (ता. एक) सकाळच्या सुमारास घरफोडीची घटना उघडकीस आली. महादेव परगणे (वय ३५) हे शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. रात्रपाळीत ड्युटीवर ते तैनात असल्याने पत्नी नातेवाइकांकडे गेली होती. चोरट्याने बंद घराला लक्ष्य केले. घराच्या समोरील दाराचा कोंडा तोडला.

चोरट्यांनी घरातील दोन लाकडी कपाटे हुसकली तसेच गोदरेज कपाट फोडून सोन्याचे ७५ ग्रॅम दागिने त्यामध्ये मंगळसूत्र, चपळाहार, अंगठ्या, गळ्यातील लॉकेट, काही चांदीची भांडी असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. परगणे गुरुवारी (ता. एक) सकाळी ड्युटीवरून परत आले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनात आले.

पोलिसानेच केला घटस्फोटीत प्रेयसीवर बलात्कार, मुख्यालयातून अटक 
 

परगणे यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांचे श्‍वान रहाटगाव मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन थांबले. 

चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून चोरी केली आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सराईतांची चौकशी सुरू केली. 
-दिलीप चव्हाण, पोलिस निरीक्षक, नांदगावपेठ ठाणे. 

चिता रचली, सारे साहित्य आणले अन् तो जिवंत झाला, सारेच अवाक् 
 

सिद्धी विनायक कॉलनीत 80 हजारांची चोरी 

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत सातूर्णा येथे सिद्धी विनायक कॉलनी घनश्‍यामनगरच्या मागे अनुप गणेश कडू (वय ३२) यांचे अपार्टमेंट परिसरातील घर फोडून सोन्याची एक 15 ग्रॅमची बांगडी व रोख रक्कम, असा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. श्री. कडू यांच्या तक्रारीवरून राजापेठ ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the house of the police is no safe because of Theft