आता तिसऱ्या आघाडीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

विशेष म्हणजे विद्यमान आमदार, माजी मंत्री, उद्योजक, माजी नगराध्यक्ष असा एकापेक्षा एक जणांनी निवडणूक लढणार असल्याची इच्छा बोलून दाखविली आहे. यामुळे सर्वाधिक चुरशीची लढत यंदा जिल्हा गटात होण्याची शक्‍यता आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर आली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होण्याची चर्चा असतानाच आता तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या लक्षात घेता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग अनेकांना धक्का देणारा असणार आहे. 

हे वाचा— शिवभक्तांनो, पचमढी यात्रेला जाताय? जाणून घ्या बसचे वेळापत्रक

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल

वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्राधिकरणाने जाहीर केला आहे. येत्या 26 मार्चला बॅंक संचालकांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अंतिम मतदारयादी शनिवारी (ता. 15) प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्याची आर्थिक नाळ आपल्या ताब्यात राहावी, यासाठी शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन 'महाविकास आघाडी'च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शिवसेनेला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे असे चित्र असतानाच बॅंकेतील "वजनदार' सहकार नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय तयार करण्याची खेळी सुरू केली आहे. यात विद्यमान आठ ते दहा संचालकांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरता येईल का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालकांच्या पदांसाठी निवडणूक होत आहे. अनेकांना "शेला नारळ' देण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे. याची कुणकूण लागताच संचालक सक्रिय झाले आहे. नेत्यांना "धक्का'देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. सहकारात पक्षबांधीलकी नसते हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

हे वाचा— काही झालं तरी, आम्ही प्रेमविवाह करणार नाही म्हणजे नाही...

जिल्हागटात दिग्गजांची लढत

तालुका गटात यावेळी स्पर्धा असली तरी सर्वाधिक स्पर्धा जिल्हा गटांसाठी असणार आहे. जिल्हा गटात केवळ दोन जागा आहेत. या दोन जागांवर आतापर्यंत तब्बल 24 जणांनी दावा केला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार, माजी मंत्री, उद्योजक, माजी नगराध्यक्ष असा एकापेक्षा एक जणांनी निवडणूक लढणार असल्याची इच्छा बोलून दाखविली आहे. यामुळे सर्वाधिक चुरशीची लढत यंदा जिल्हा गटात होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेची प्रवेशाची तयारी

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी संचालक आहेत. ते सहकारातील ज्येष्ठ नेते असून कॉंग्रेसच्या मुशीतच वाढलेले आहेत. यावेळी मात्र, शिवसेनेने बॅंक आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी काहींचा पत्ता कट करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागेवर "कुबेर' प्रसन्न असलेल्यांची नावे संचालकपदासाठी चर्चेत ठेवली जात आहे. दिग्रसमधून माजी मंत्र्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the third leading challenge