यवतमाळमध्ये आयपीएल सट्टा जोरात; दहा अड्ड्यांवर छापा, तर एका बुकीला अटक

one bookie arrested in ipl betting in yavatmal
one bookie arrested in ipl betting in yavatmal

यवतमाळ : दुबई येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून, प्रत्येक सामन्यावर कोट्यवधींचा सट्टा खेळला जात आहे. अमरावती-यवतमाळ कनेक्‍शन समोर येताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात शहरातील दहा सट्टा अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली. त्यात केवळ माळीपुरा येथे एक सट्टा उतरविणारा बुकी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजू गोटफोडे(वय 40, रा. माळीपुरा, यवतमाळ), असे या बुकीचे नाव आहे.

आयपीएलच्या या हंगामात प्रत्येक बॉलवर कोट्यवधींचा सट्टा खेळला जात आहे. कमी वेळात मालामाल होण्यासाठी बुकीदेखील चांगलेच सक्रीय झाले आहेत. अमरावती-नागपूर-यवतमाळ, असे सट्टेबाजारातील कनेक्शन आहे. यवतमाळ शहरात दहा मोठे बुकी आहेत. सट्टेबाजारातील कनेक्‍शन समोर येताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी मुस्क्‍या आवळण्यासाठी खास रणनीती आखली. त्यासाठी विशेष दहा पथके तयार केलीत. यात पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सोमवारी (ता.12) रात्री शहरात एकाच वेळी दहा पथकाने छापेमारी केली. माळीपुरा येथे घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्‍ला यांच्या पथकाने छापा टाकला. राजू गोटफोडे हा आलिशान कारमध्ये बसून एका चिठ्ठीवर आयपीएलचा सट्टा उतरवीत होता. एका मोबाईलवर ऑनलाइन क्रिकेट मॅच सुरू होती. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. मात्र, घरात काहीच हाती लागले नाही. गोटफोडे याच्याकडून रोख नऊ हजार 590, अलिशान कार, मोबाइल, असा एकूण आठ लाख 17 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिसांनी इतरही नऊ ठिकाणी छापे टाकले. मात्र, जुगार उतरवीत असलेले ठिकाण सोडून पोलिस पथकांनी थेट घरांचीच झडती घेतली. त्यामुळे पथकांच्या हाती काहीच मिळू शकले नाही. याप्रकरणी ठाणेदार दिनेशचंद्र शुक्‍ला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून राजू गोटफोडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षकांनी अतिशय गोपनीय पद्धतीने राबविलेल्या छापेमारीमुळे सट्टाबाजारात खळबळ उडाली आहे.

बाभूळगावात एसपींकडून 'टिप्स' -
जिल्ह्यातील निवडक दहा पोलिस ठाण्यांतील ठाणेदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक व खास कर्मचाऱ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये बाभूळगाव पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. भेटीचा निरोप गुप्त असल्याने अधिकारीदेखील अनभिज्ञ होते. पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी आयपीएल सट्टा अड्ड्यांवर छापेमारी करायची आहे, असे सांगत टिप्स दिल्या.

दहा कर्मचाऱ्यांनाच माहिती -
जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अधिकारी बाभूळगावात पोहोचले. त्यांना छापेमारी करायची आहे, असे सांगण्यात आले. कुठे जायचे, याबाबत माहिती देण्यात आली नाही. पोलिस अधीक्षकांच्या सोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनाच ठिकाणाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. छापा कुठे टाकायचा, याची कल्पना असलेला कर्मचारी पथकात देण्यात आला आणि पुढील कारवाई करण्यात आली.

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com