
एका विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशासाठी 11.34 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
पुसद (जि. यवतमाळ) : बनावट संकेतस्थळ तयार करून व खोटा ई-मेल पाठवून पुसद येथील एका विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशासाठी 11.34 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही घटना कोरोना काळातील आहे. यासंदर्भात कर्नाटकातील एका कथित डॉक्टरविरोधात पुसदच्या वसंतनगर पोलिसांत सोमवारी (ता.14) तक्रार दाखल केली असून, आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा - मास्क ठरतोय 'ऑलराऊंडर'; नियमित वापरामुळे...
पुसद येथील वीज महावितरण कंपनीतील ऑपरेटर दिलीप सुधाकर राजे (रा. तिरुपती पार्क, पुसद) यांनी ही तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव डॉ. शैलेंद्र जोशी (बंगळूर) असे आहे. दिलीप राजे यांचा मुलगा वेदांत हा बारावीला होता. त्याने नीट परीक्षेत 74 टक्के गुण मिळविले. दरम्यान, त्याच्या मोबाईलवर डॉ. शैलेंद्र जोशी यांच्याकडून कर्नाटक राज्यातील मंगलोर येथील कस्तुरबा एमबीबीएस महाविद्यालय प्रवेशासंबंधात व्हॉट्सअॅपवर मेसेज व ई-मेल आला. एमबीबीएस प्रवेशासाठी 39 लाख 74 हजार रुपये प्रवेशशुल्क व डोनेशन असल्याची माहिती होती. या माहितीची शहानिशा न करता राजे यांनी संपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर संवाद साधला. तेव्हा डॉ. जोशी यांनी राजे यांना वेदांतच्या मोबाईलवर वेबसाइट पाठविली.
हेही वाचा - Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह...
प्रथम वर्ग एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यासाठी कर्नाटकातील दोन बँक व सिंडिकेट बँकेचा खाते क्रमांक दिला. या खात्यांवर राजे यांनी 18 मार्च ते 24 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या तारखांना सोयीनुसार कधी 50 हजार, तर कधी एक लाख रुपये अशी एकूण 11 लाख 34 हजार जमा केलेत. यासाठी 22 वेळा बँकेचे ट्रांजेक्शन झाले. या व्यवहारासाठी आरोपीने हुशारीने आधीचा व्हॉट्सऍप बंद करून साध्या मोबाईलवर टेक्स मेसेजचा वापर केला. लॉकडाऊनच्या काळात राजे यांना प्रत्यक्ष कर्नाटकातील बंगरूळुला जाता आले नाही, याचाच गैरफायदा आरोपीने घेतला.
हेही वाचा - सापाला बाहेर काढण्यासाठी पेटविले लिंबाचे झाड, आगीने रौद्ररूप घेऊनही सुदैवाने बचावला साप
अनलॉक झाल्यानंतर राजे कुटुंबीयांनी बंगळुरूला दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली. मात्र, आरोपीची भेट झाली नाही. त्यांनी बंगळुरू येथील कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता, पाठविण्यात आलेली वेबसाइट व आरोपी डॉ. शैलेश जोशी यांचा महाविद्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे राजे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर दिलीप राजे यांनी फसवणूक प्रकरणाची तक्रार पुसद येथील वसंतनगर पोलिसांमध्ये केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शशिकांत दोडके तपास करीत आहेत.
हेही वाचा - पूरपरिस्थितीला दोन महिने लोटल्यानंतर केंद्रीय पथक २४ला विदर्भात, आता कशाची करणार...
एमबीबीएस प्रवेशासंदर्भात झालेल्या फसवणुकीची चौकशी सुरू आहे. आरोपीचे कॉल डिटेल्स, बॅंकांचे ट्रांजेक्शन तपासून आरोपीला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे. या प्रकरणात आरोपीने दिलेले नाव, वेबसाइट, ई-मेल आयडी या सर्वच गोष्टी बनावट आहेत. आरोपींचे कॉल रेकॉर्ड उपलब्ध असून, आरोपीचा लवकरच शोध घेऊ.
- शशिकांत दोडके, पोलिस उपनिरीक्षक, पुसद.