काय ही दैना? 3 दिवसांत केवळ 550 रुपयांची कमाई 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात 4 पैकी 3 फेऱ्या रद्द करण्याची पाळी मोर्शी आगारावर आली होती. उर्वरित फेऱ्यासुद्धा कमी उत्पन्नातच कराव्या लागल्याचे दिसून आले.

मोर्शी (जि. अमरावती)  : एस.टी. महामंडळाच्या बस ग्रामीण भागातील रस्त्यांवर धावत असल्या तरी कोरोनाच्या सावटात या फेऱ्या प्रचंड घाट्याच्या ठरत आहेत. 22 मेपासून मोर्शी आगारातून बस सुरू झाल्या. मात्र, 14 बसने तीन दिवसांत एक हजार 17 किलोमीटरचे अंतर कापून केवळ 550 रुपये कमाई केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनमुळे राज्य शासनाने मार्च महिन्यामध्ये एसटी बससेवा बंद केली होती. परंतु लॉकडाउन शिथिलतेमुळे काही अटी व नियमांच्या आधारे संपूर्ण राज्यात बससेवा सुरू केली आहे. मोर्शी आगारामधूनसुद्धा 22 मेपासून ग्रामीण भागात बससेवा सुरू झालेली आहे. परंतु प्रवाशांअभावी या आगाराचे उत्पन्न खूपच कमी असल्याचे दिसून येते. डिझेलच काय तर वाहक व चालकाचे रोजचे वेतनसुद्धा त्यातून निघणे कठीण झाले आहे. 

अवश्य वाचा- काय सांगता..! गोंदिया जिल्ह्यात आहे जगातील सर्वाधिक वयाची महिला (व्हिडिओ) 

पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात 4 पैकी 3 फेऱ्या रद्द करण्याची पाळी मोर्शी आगारावर आली होती. उर्वरित फेऱ्यासुद्धा कमी उत्पन्नातच कराव्या लागल्याचे दिसून आले. पुढील दोन दिवसांत बसची संख्या व फेऱ्या वाढविण्यात आल्या, परंतु उत्पन्न मात्र फारच कमी आलेले आहे. पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसात 6 प्रवाशांनी बसद्वारे प्रवास केला असून 2 बसच्या माध्यमातून 8 फेऱ्या करण्यात आल्या. या बसने 188 किलोमीटर अंतर पार केले असून यातून मोर्शी आगाराला 105 रुपये उत्पन्न प्राप्त झाले. 23 तारखेला 11 प्रवाशांनी प्रवास केला असून 6 बसद्वारे 16 फेऱ्या करून 284 किलोमीटर अंतर पार केले व 170 रुपये उत्पन्न मिळविले. त्याच बरोबर रविवारी (ता.24) 5 बसने 545 किलोमीटर अंतर पार करून 16 प्रवाशांद्वारे 275 रुपये उत्पन्न मिळविले. 

ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना प्रवेश नाही

अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातच जिल्ह्यांतर्गत एसटी सुविधा असून एका सीटवर एकच प्रवासी बसणार आहे. अमरावती मनपा हद्दीत बस प्रवेश करणार नसून ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना बसमध्ये प्रवेश नाही. त्याच बरोबर तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे यांसारखे नियम आगारात व बसमध्ये ठेवावे लागणार आहे. 

आकडे बोलतात 
बस                  14 
फेऱ्या                38 
किमी                1017 
प्रवासी               33 
एकूण उत्पन्न       550 रु. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 550 rs. earned by st bus in three days. Low response.