अरेरे! आदिवासींची पिके वनविभागाने का केली उद्‌ध्वस्त...हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

दरवर्षीप्रमाणे या वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, वनविभागाने मदनापूर, तुकुम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पिकावरून ट्रॅक्‍टर चालविला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील मदनापूर, तुकुम या गावातील अनेक गरीब आदिवासी शेतकरी बांधवांच्या पूर्वजांपासून या क्षेत्रातल्या वनजमिनीवर अतिक्रमण आहे. यातील अनेकांना जमिनीचे पट्टे मिळाले आहेत; तर, काहींची प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. अशास्थितीत वनविभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वनजमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यामुळे शेतातील कापूस, तूर, सोयाबीन व धानाचे पऱ्हे भुईसपाट झाले आहेत.

 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रालगत मदनापूर व तुकुम ही गावे वसली आहेत. या गावातील आदिवासी बांधव पूर्वजांपासून या क्षेत्रातील जल, जमीन व जंगलाचा वापर करीत आहेत. या क्षेत्रातील अतिक्रमित वनजमीन कसून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा कसातरी उदरनिर्वाह करीत आहेत. मदनापूर या गावाला सामूहिक वनहक्क दावा प्रदान करण्यात आला आहे. तसेच आदिवासी जाती जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम 2006 व 2007 प्रमाणे काही शेतकऱ्यांचे वनहक्क दावे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.

 

यामुळे दरवर्षीप्रमाणे या वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, वनविभागाने मदनापूर, तुकुम येथील अतिक्रमित आदिवासी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पिकावरून ट्रॅक्‍टर चालविला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

असं घडलंच कसं : शिल्पग्राम प्रशिक्षण केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद! वाचा काय आहे कारण

नुकसानाची भरपाई मिळावी

वनविभागाने वडिलोपार्जित कब्जा, वहिवाट असलेल्या जागेवर बेदखल करून शेतमालाचे नुकसान केले. ही कार्यवाही वनपरिक्षेत्र कार्यालय पळसगाव यांच्यातर्फे करण्यात आली. यात प्रतिआदिवासी शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिक्रमित वनजमिनीची चौकशी करून आदिवासी समूह घटकांना न्याय मिळावा व झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना अतिक्रमित आदिवासी वनजमिनी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

सूचना न देता पिके केली भुईसपाट
दिवसरात्र कष्ट करून शेतात कापूस, तूर आदी पिकांची लागवड केली. पीकही चांगले आले. मात्र, वनविभागाने कोणतीही सूचना न देता पिकावर ट्रॅक्‍टर चालविला.
- धृपदा गुलाब भरडे, शेतकरी महिला, मदनापूर

जाणून घ्या : शेतीचा वाद विकोपाला, तब्बल एवढ्या जणांवर झाले गुन्हे दाखल

शेतकऱ्यांना नोटीस बजावली
मागीलवर्षीच संबंधित अतिक्रमित शेतकऱ्यांना नोटीस बजावली होती. वन्यप्राण्यांकरिता सुरक्षित कॉरिडॉर व्हावा याकरिता वनहक्क पट्ट्याव्यतिरिक्त अतिक्रमित शेत वरिष्ठांच्या आदेशानुसार सपाट करण्यात येत आहे.
- आर. एम. ठेमस्कर, वनपरिक्षेत्राधिकारी, पळसगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops! the forest department destroyed the crops of the tribals