कृषी विधेयकाविरोधात संघटना एकवटल्या; मंगळवारी बंदची हाक 

सुधीर भारती 
Tuesday, 8 December 2020

या कायद्यामुळे शेतमालाला आपल्या हक्काचा बाजार असणार नाही. हजार समित्या रिकाम्या होतील, हे कायदे शेतकऱ्यांना संपविणारे असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

अमरावती : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली येथे ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी (ता. आठ) देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला किसान संघर्ष समितीसह विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून बंद यशस्वी करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. 

मंगळवारी आयोजित भारत बंदमध्ये काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी आपला पाठिंबा दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी सरकारने लोकसभेत कुठल्याही संघटनांशी चर्चा न करता कृषीविषयक कायदे संमत करून घेतले.

या कायद्यामुळे शेतमालाला आपल्या हक्काचा बाजार असणार नाही. हजार समित्या रिकाम्या होतील, हे कायदे शेतकऱ्यांना संपविणारे असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. मंगळवारी सकाळी १० वाजता स्थानिक इर्विन चौकात समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पत्रकार परिषदेला तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, ऍड. सिद्धार्थ गायकवाड, जे. एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे, भय्यासाहेब निचळ, सलीम मिरावाले आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा 

दिल्लीतील किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकरी आंदोलनातील सर्व मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी संजय ठाकरे, सुयोग वाघमारे, शरद काळे, सुजाता शेळके, मनोज सोळंके, अजिंक्‍य पाटील, दीपक लोखंडे, कुणाल गावंडे आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

डॉ. शीतल आमटे मृत्यूप्रकरण ः डावखुऱ्या नसतानाही उजव्या हाताला कसे टोचले इंजेक्शन?
 

प्राथमिक शिक्षकांचा पाठिंबा 

मंगळवारी आयोजित भारत बंदला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही पाठिंबा दिला आहे. शिक्षकांनी आपले कामकाज सांभाळून स्थानिक पातळीवर या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उदय शिंदे, विजय कोंबे, शिवाजी साखरे, राजन कारेगावकर, केदू देशमाने, राजेंद्र नवले, सयाजी पाटील, शिवाजी दुशिंग, आबा शिंपी, राजेश सावरकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले. 

 

गोंडवाना वनवृत्तनिर्मिती धोरणाला का होतोय विरोध?

भारत बंदमध्ये व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे 

केंद्राने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये प्रत्येक नागरिकासह व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यातील सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यामध्ये पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार सुलभा खोडके व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. आठ) महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ९ वाजता राजकमल चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizations rallied against the Agriculture Bill; Call for a shutdown on Tuesday