गुंगीचे बिस्कीट देऊन प्रवाशास लुटले!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

अकोला ते मंगरुळपीर एसटी बसमधील प्रकार घडला. या घटनेमुळे बसमध्ये गुंगीचे औषध देऊन लुटणारे चोरटे सक्रिय असल्याची चर्चा होत आहे. 

किन्हीराजा (जि.वाशीम) : अकोल्यावरून खासगी कामे तसेच रुग्णालयातील तपासणी अटोपून एसटी बसने गावी जाणाऱ्या प्रवाशास बिस्कीटाद्वारे गुंगीचे औषध देऊन लुटले. ही घटना गुरुवारी (ता.19) सायंकाळच्या सुमारास अकोला- मंगरुळपीर या मंगरुळपीर आगाराच्या बसमध्ये घडली. 

किन्हीराजा येथील दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी बद्रीनाथ रतनसिंग आडे हे खाजगी काम तसेच रुग्णालयाकरिता गुरुवारी अकोला येथे गेले होते. अकोला येथील कामे तसेच दवाखान्यात तपासणी झाल्यानंतर ते सायंकाळी चार वाजता अकोला ते मंगरुळपीर या मंगरुळपीर आगाराच्या (एमएच 06, एस- 8048) बसने शेलुबाजार येथे उतरण्यासाठी प्रवास करीत होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी मुलाला शेलुबाजार येथे येण्यास सांगितले. मात्र, सायंकाळचे सात वाजल्यानंतरही वडिल बसमधून आले नाहीत. तसेच फोन लावल्यास फोनही उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा चिंतीत झाला होता. 

हेही वाचा - कुटुंब नियोजनात पुरुष नामानिराळेच!

बसच्या मागील खुर्चीवर आढळले बेशुद्ध अवस्थेत 
वारंवार फोन केल्यानंतर मंगरुळपीर आगाराच्या वर्कशॉपमधील साफसफाई कर्मचाऱ्याने फोन उचलला. तसेच बसच्या मागील सिटवर पडलेले व्यक्ती तुमचे नातेवाईक आहेत का? असे विचारले. त्यामुळे विश्‍वानाथ आडे यांनी ही माहिती मंगरुळपीर येथील त्यांच्या काकांना दिली. त्यांनी तातडीने बसस्थानक वर्कशॉप गाठले. तसेच बद्रीनाथ आडे हे बसच्या मागील खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत होते. 

अधिक वाचा - तामिळनाडूतील नीट गैरव्यवहाराची पाळेमुळे महाराष्ट्रात

अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशनला तक्रार
त्यांच्या पायजाम्याचे खिसे कापलेले होते. त्यामुळे त्यांना तातडीने वाशीम येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना रात्री किन्हीराजा येथे आणण्यात आले. त्यानंतर सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांना शुद्ध आली. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता.20) पुन्हा अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे बसमध्ये गुंगीचे औषध देऊन लुटणारे चोरटे सक्रिय असल्याची चर्चा होत आहे. यासंदर्भात अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, अकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती विश्‍वनाथ आडे यांनी दिली.

उपचारानंतरही गुंगीचा प्रभाव कायम
बसममध्ये प्रवास करताना बिस्कीट खाण्यास दिले. तसेच वारंवार नाकाजवळ आणल्या जात असल्यामुळे सदरील बिस्कीटावर गुंगीचे औषध असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, रात्र उलटूनही त्यांच्यावरील गुंगीचा प्रभाव कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांना आज सकाळीच अकोला येथे उपचारासाठी दाखल केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passenger robbed by anestasia biscuit