मास्क न लावता फिरत होते गावभर, असा बसला फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्ह्यामध्ये साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असून या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. स्वतःचे तसेच इतरांचे सामाजिक आरोग्य धोक्‍यात न टाकता आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचना तसेच प्रशासनाचे निर्देश नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. मात्र, आजही अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आता विनामास्क प्रत्येकावर दंड ठोठावण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 783 नागरिकांकडून एक लाख 56 हजार रुपयांचा वसूल केला आहे. तर रस्त्यावर थुंकणाऱ्या 73 नागरिकांवर 8 हजार 500 रुपये दंड मनपाने ठोठावला आहे.

जिल्ह्यामध्ये साथरोग प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 लागू असून या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. स्वतःचे तसेच इतरांचे सामाजिक आरोग्य धोक्‍यात न टाकता आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचना तसेच प्रशासनाचे निर्देश नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

783 नागरिकांना दंड

कोरोना आजारासह अन्य साथजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, खर्रा खाऊन पिचकारी मारणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे घराबाहेर पडायचे असेल तर शहर असो वा गाव प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यासाठी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोरोना सोबतचा दीर्घ संघर्ष लढताना यापुढे चेहऱ्यावरचा मास्क अनिवार्य राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून यासाठी प्रसंगी दंड आकारा असेही पोलिस विभागाला बुधवारी दिलेल्या निर्देशात स्पष्ट केले आहे. कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून आता आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.

अवश्य वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नाकारला पॅरोल; तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश

कामाचे ठिकाण, सार्वजनिक स्थळी, दुकाने, आस्थापने, प्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारास, कर्मचारी तसेच सुविधेचे लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी कायम मास्क वापरणे गरजेचे आहे. असे न केल्यास 200 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तसेच गुटखा, तंबाखू खाऊन थुंकल्यास संसर्गजन्य आजार होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे थुंकणे हे स्वतःसाठी व इतरांसाठी घातक आहे. असे केल्यास दंडात्मक कारवाई प्रशासनाअंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: penalty on chandrapur people for not wearing mask