people
people

अचलपूरची 'शकुंतला' गेली कुठे? गेल्या दोन वर्षांपासून या जीवनवाहिनीची लोकं बघताहेत वाट  

अचलपूर (जि. अमरावती) : एकाच वेळी शेकडो लोकांना वाहून नेण्याची क्षमता असलेली रेल्वे खऱ्या अर्थाने गरीब-सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. अचलपूर तालुक्यातील लहानसहान गावांना जोडणारी शकुंतला रेल्वे बंद आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ‘शकुंतला निव्वळ रेल्वे नव्हे तर ती आमच्या उद्योगांना चालना देणारी मायमाउली आहे. ही प्राचीन रेल्वे मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावरील १९० किलोमीटरचा प्रवास ताशी २० किलोमीटरच्या गतीने पूर्ण करते. यवतमाळ आणि अमरावतीमधील गोरगरिबांची ही जीवनरेखाच आहे.’ संजय देंडव आणि श्रीधर क्षीरसागर यांची ही भावना शकुंतलेची नितांत गरज अधोरेखित करते. एकीकडे देशात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. घंटो का प्रवास मिनिटोमें करण्यासाठी बुलेट ट्रेनही प्रस्तावित आहे. एवढे सारे असताना केवळ शकुंतलेच्या बाबतीत हा दुजाभाव का? महाभारत काळातही शकुंतलेला वनवास सहन करावा लागला. या शकुंतलेची शापातून मुक्ती कधी होणार? हाच प्रश्न महत्वाचा आहे. 

ओघवते आणि ओजस्वी वक्तृत्वाचे धनी असलेल्या वक्ता दशसहस्रेषू प्राचार्य दिवंगत राम शेवाळकर यांच्या अचलपूर नगरीत पाय ठेवताच एक विलक्षण अनुभूती आली. प्रकांडपंडित थोर साहित्यिकाचे हे गाव कसे असेल, याची उत्सुकता होतीच. निमुळत्या गल्लीबोळांतून ५२ पुऱ्यांचा इतिहास असलेले हे पूर्वीचे एलीचपूर व आताचे अचलपूर शहर फारसे बदलले नसल्याचे लोकांनी सांगितले. बिलनपुरा, सरमसपुरा, चावलमंडी, गांधीपूल, प्राचार्य राम शेवाळकर यांचे निवासस्थान असलेले माळवेशपुरा येथील सभागृह, भुलभुलैय्या मंदिर, शनी मंदिर, हौज कटोरा अशा ऐतिहासिक व पौराणिक ठिकाणी अचलपूरचे ‘सकाळ'चे शहर बातमीदार राज इंगळे घेऊन गेले. इंगळे यांच्यासोबत भरपूर फिरलो. तेव्हा अचलपूरचा इतिहास, पौराणिक महत्त्व, येथील संस्कृती तर माहिती झाली. सोबत इथल्या समस्यांची उकल होत गेली. शकुंतला रेल्वेची मागणी तर जणू प्रत्येकानेच केली.

सर्वसामान्य नागरिकांची जीवनदायिनी असलेल्या शकुंतलेच्या बाबतीत लोक बोलू लागले. शकुंतलेची गोष्ट म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर लगेच उभी राहते कालिदासाने लिहिलेली दुष्यंताची शकुंतला. पण ही गोष्ट त्या शकुंतलेची नाही; तर ती आहे अशा एका शकुंतलेची जी १९१० पासून अस्तित्वात आली आहे. ती म्हणजे पूर्वीची ब्रिटिशकालीन व आताची भारतीय शकुंतला रेल्वे. हा एकच असा रेल्वेमार्ग आहे जो भारतीय रेल्वे महामंडळाच्या आधिपत्याखाली येत नाही. १९५२ साली जेव्हा सर्व रेल्वेलाइन्सचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा शकुंतला रेल्वेचा यात समावेश का केला गेला नाही, याचे कारण समजायला मार्ग नाही. मात्र अनिश्‍चित काळासाठी बंद झालेली शकुंतला रेल्वे लवकर सुरू करण्याची आर्त हाक येथील जनतेने केली. मागील दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावावर ही रेल्वे बंद आहे. दोन वर्षांपासून लॉकडाऊन असलेली शकुंतला रेल्वे कधी सुरू होणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

शकुंतला रेल्वेचे इंजीन तसेच डबे सध्या कोणत्या स्थानकावर आहेत याचा पत्ता नाही. मात्र, अचलपूरच्या शकुंतला रेल्वेस्थानकाला भेट दिली असता सर्वत्र सन्नाटा होता. ज्या रेल्वेस्थानकावर कधीकाळी प्रवाशांची रेलचेल पाहायला मिळायची, त्याठिकाणी आजघडीला केवळ वास्तू उभी आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात अधिकच वाईट परिस्थिती आहे. संपूर्ण परिसरात काटेरी झुडपे आणि तणकट वाढलेले दिसले. रेल्वेस्थानकापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लोखंडी पुलाची अवस्था बिकट होत असल्याचे दिसले. या भेटीदरम्यान अचलपूर शहरातील शकुंतलेने प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांची भेट झाली. त्यात रवी घाटे, सचिन मोहोड, विलास थोरात, राजू तायडे, विनोद येवतकर, प्रकाश मेहरे, दिलीप गोबाडे, प्रकाश जयसिंगपुरे, मयूर भंडारी, विजय काकडे, कांतुलाल चुडाह, महेंद्र खराटे, कान्हा जिजोते, पंडित मिश्रा, सुनील बुरनासे, मोहन भंडारी यांचा समावेश होता. शकुंतला सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी सर्वांनीच केली.

१९१० साली आली शकुंतला

१९१० साली किलिक निक्‍सन या ब्रिटिश कंपनीने शकुंतला रेल्वे सुरू केली. ब्रिटिश सरकारच्या साहाय्याने त्यांनी सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी सुरू करून विदर्भात रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू केले. या रेल्वेमार्गाने कापसाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस होता. १९१६ साली हा रेल्वेमार्ग तयार झाला आणि त्यानंतर लवकरच मालवाहू रेल्वेबरोबरच प्रवासी गाड्याही या मार्गावर धावू लागल्या. या रेल्वेचे इंजीन नऊ स्टीम असून, ते १९२१ साली मॅंचेस्टर येथे बनविले गेले होते. हे इंजीन १९२३ साली रेल्वेच्या सेवेत रुजू झाले आणि तेव्हापासून १९९४ पर्यंत हे इंजीन होते. त्यानंतर १९९४ मध्ये या रेल्वेला डिझेल इंजीन देण्यात आले. आज हा रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनच्या अधीन आहे; पण शकुंतला रेल्वेचा प्रवास आजही नॅरोगेजचा आहे.

मागील वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेसह सर्वच कामे बंद होती. आता टप्प्याटप्याने कामे सुरू झाली आहेत. शकुंतला रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचे कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शकुंतला रेल्वे कायमची बंद झाली, असे जर कोणी म्हणत असेल तर चुकीचे आहे.
-तेजस सवई, 
रेल्वेस्थानक अधिकारी, मूर्तिजापूर

रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावे
शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने केंद्रीय रेल्वेमंत्री आणि खासदारांनी शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून गोरगरिबांना शकुंतलेचा लाभ होईल.
-बळवंत वानखडे, 
आमदार, दर्यापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com