हा दुष्ट कोरोना कधी करणार सीमोल्लंघन? प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्‍न; विजयादशमीच्या आनंदावर निराशेचे विरजण

मिलिंद उमरे
Saturday, 24 October 2020

दरवर्षी देशभरात विजयादशमीचा सण धुमधडाक्‍यात साजरा होतो. यानिमित्त घरातील साफसफाई, वाहने, घरातील उपयोगी साहित्य, शस्त्रे यांची पूजा केली जाते. भल्या पहाटे उठून सीमोल्लंघनाची तयारी करण्यात येते. याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्राने रावणाला ठार केले होते.

गडचिरोली : सत्याचा असत्यावर, सुष्टाचा दुष्टावर, खऱ्याचा खोट्यावर विजय म्हणून विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा करण्यात येतो. पण, यंदा कोरोनाशी सुरू असलेले तुंबळ युद्ध थांबायचे नावच घेत नसल्याने हा दुष्ट कोरोना जगातून आणि मानवीजीवनातून कधी सीमोल्लंघन करणार, असा प्रश्‍न सर्वांना सतावत आहे. या कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीचे विरजण रविवारी (ता. 25) विजयादशमीच्या सणावरही पडलेले दिसून येत आहे.

दरवर्षी देशभरात विजयादशमीचा सण धुमधडाक्‍यात साजरा होतो. यानिमित्त घरातील साफसफाई, वाहने, घरातील उपयोगी साहित्य, शस्त्रे यांची पूजा केली जाते. भल्या पहाटे उठून सीमोल्लंघनाची तयारी करण्यात येते. याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्राने रावणाला ठार केले होते. त्यासाठी त्याला देशाची सीमा पार करून लंकेत जावे लागले होते. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही विजयादशमीच्या दिवशी गावाची वेस ओलांडण्याची प्रथा आहे. 

अधिक वाचा - VIDEO: मृत्यूचा 'अभद्र योगायोग'; या गावात एकाचा मृत्यू झाला तर आठवडाभरात दुसरा जातोच; नागरिकांची वाढते धाकधूक

गावाच्या वेशीवर असे सीमोल्लंघन करताना चाष किंवा निलपंख (इंडियन रोलर/ब्ल्यू जे) हा पक्षी दिसल्यास अतिशय शुभ मानले जाते. पण, यंदा नागरिक स्वत: सीमोल्लंघन करण्याऐवजी हा कोरोना जगाची वेस ओलांडून अदृश्‍य कधी होईल, याची वाट बघत आहेत. एरवी या सणाला सकाळपासूनच घराघरांत चैतन्य असते. सकाळी आंब्याच्या पानांची मंगल तोरणे घरात बांधली जातात. घरातील वाहनांना स्वच्छ करून झेंडूच्या फुलांचे हार चढविले जातात. शस्त्रपूजन केले जाते. 

यंदाही घरोघरी हे सारे होणार असले, तरी त्यात पूर्वीचा उत्साह राहणार नाही. शिवाय या सणाला सोने म्हणून आपट्याची पाने परस्परांना देण्याची प्रथा आहे. या प्रथेवरही कोरोनाचे सावट आहे. मागील काही महिन्यांपासून हस्तांदोलनाची अनेकांची सवयच सुटली आहे. दसऱ्याचे सोने देताना सोने हातात दिल्यावर हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्यात येतात. म्हणून ही अडचण कशी सोडवायची, याचाही अनेकजण विचार करत आहेत. काहींनी आपट्याची पाने आणि हात सॅनिटाइझ करायचे पण, सोने वाटायचेच असाही निर्धार केला आहे. 

पण, यानिमित्त गर्दी व्हायला नको, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच अनेक नियम पाळून हा सण साजरा करावा लागणार आहे. तसेही महानायक अमिताभ बच्चन प्रत्येकाला कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कानीकपाळी ओरडून सांगत आहेत, "जबतक दवाई नही, तबतक ढिलाई नही', "दो गज की दूरी, मास्क है जरूरी' त्यांचे हे कोरोनामंत्र ऐकण्याशिवाय सध्यातरी कुठलाच पर्याय नाही.

रावण, कुंभकर्ण, मेघनाथाची मज्जा...

रामायणात रामचंद्राच्या बाणाने ठार झालेल्या रावणाचा पुतळा तयार करून प्रतिकात्मक रूपात सार्वजनिकरीत्या जाळण्याची पूर्वापार परंपरा आहे. रावणाच्या पुतळ्यासोबतच त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा मेघनाद उर्फ इंद्रजित यांचेही पुतळे जाळले जातात. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. सरकारने कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातल्यामुळे अनेक मंडळांनी रावण दहनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद पेटण्यापासून बचावले आहेत.

क्लिक करा - पारंपरिक चौकट मोडून वयाच्या सत्तावीसव्या वर्षी घेतील सर्जिकल उद्योगात भरारी; विदर्भातील पहिलीच युवती

निघणार नाही राजांची पालखी...

अहेरी येथील दसरा महोत्सवाला तब्बल 200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. हा सण येथे भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यानिमित्त अहेरी संस्थानच्या राजांची पालखीतून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. पण, कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. परंपरेप्रमाणे शस्त्रपूजन व दसऱ्याच्या दिवशी अहेरी राजनगरीत निघणारी राजांची पालखी यावर्षी निघणार नाही. त्याऐवजी वाहनाने जाऊन सीमोल्लंघन करून गडअहेरी येथील गडीदेवीचे दर्शन व शमीवृक्षाचे पूजन केले जाणार असल्याची माहिती अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे. तसेच परंपरेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन झाल्यावर राजमहालासमोर अहेरी इस्टेटच्या आदिवासी बांधवांना होणारे मार्गदर्शनही होणार नाही. सकाळी निघणारी साईबाबांची पालखी यावर्षी अहेरी शहरात न फिरविता राजमहालातच पूजन करून दर्शनासाठी ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people asking question when will corona go even festival are coming