esakal | अमरावतीकरांची 'चिअरफुल्ल' दिवाळी, मंदावलेला बाजार उसळला
sakal

बोलून बातमी शोधा

people crowd at market in amravati

कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होते किंवा नाही याबाबत मागील अनेक दिवसांपासूनचे ठोकताळे अमरावतीकरांनी मोडले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तसेच लक्ष्मीपूजनाच्यादिवशी बाजारपेठेत चिक्कार गर्दी झाली होती.

अमरावतीकरांची 'चिअरफुल्ल' दिवाळी, मंदावलेला बाजार उसळला

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : कोरोनाच्या छायेत सुद्धा अमरावतीकरांनी दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच सोने, कपडे खरेदीमध्ये अमरावतीकरांनी उत्साह दाखविला. विशेष म्हणजे कोरोनामुळे मंदीच्या गर्तेत गेलेल्या बाजारपेठेला दिवाळीच्यानिमित्ताने बुस्टरडोस मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  

कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होते किंवा नाही याबाबत मागील अनेक दिवसांपासूनचे ठोकताळे अमरावतीकरांनी मोडले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तसेच लक्ष्मीपूजनाच्यादिवशी बाजारपेठेत चिक्कार गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच शहरातील राजकमल, जयस्तंभ, शाम चौक, रुक्‍मीणीनगर, पंचवटी तसेच अन्य भागांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाचे साहित्य, फटाके, लाह्या, बत्तासे तसेच पूजनाच्या अन्य साहित्याची रेलचेल दिसून येत होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनानंतर अनेक ठिकाणी आतषबाजी पाहायला मिळाली.

हेही वाचा - मानवाच्या लाळेमध्ये आढळले पेनकिलर, मॉर्फिनपेक्षाही असते सहापट प्रभावी

वाहनबाजार जोरदार -
कोरोनामुळे मंदीत आलेल्या वाहन व्यवसायाला दिवाळीने चांगलेच बूस्टर दिले. चारचाकी तसेच दुचाकीच्या शोरुम्समध्ये लक्ष्मीपूजनाला चिक्कार गर्दी दिसून येत होती. शोरूम चालकांच्या मते यंदाची दिवाळी वाहन व्यवसायासाठी समाधानकारक राहिली. वाहनांसोबतच कापड खरेदीकडे ग्राहकांचा ओघ दिसून येत होता. शहरातील रेडिमेड कापड दुकानांसह खादीच्या कापडांना चांगलीच मागणी दिसून आली. 

दसऱ्याप्रमणेच झेंडूला सोन्याचे भाव -
दसऱ्याप्रमाणेच दिवाळीला सुद्धा झेंडूच्या फुलांना चांगले भाव मिळाल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. दसऱ्याच्यादिवशी 120 ते 130 रुपये किलो झेंडूची फुले विकली गेली, लक्ष्मीपूजनाला सुद्धा काही अधिक फरकाने याच भावाने फुलांची विक्री झाली.   

हेही वाचा - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा...

सुतळी बॉम्बचा धमाका -
दरवर्षी अनार, चक्रीसारख्या फॅन्सी फटाक्‍यांचा ट्रेंन्ड होता. मात्र, यंदा कोरोनामुळे शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश नागरिकांनी प्रदूषण होणारे फटाके टाळले. मात्र, त्यामुळे सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब चांगलेच फोडले गेले.