लग्न करायचंय तर आधी घ्या परवानगी, जास्त जण आढळल्यास आकारणार दंड

रूपेश खैरी
Friday, 19 February 2021

अत्यावश्‍यक सेवेसाठी ही वेळ रात्री 9.30 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती आणि नगरपालिका हे शहरात आणि तालुक्‍यात या काळात नियंत्रण ठेवणार आहे. पुन्हा संचारबंदी करण्याची वेळ पडू नये, म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

हिंगणघाट (जि. वर्धा) : तालुक्‍यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत साथरोग संबंधित शासकीय नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन व अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच आता परवानगी शिवाय मंगल कार्यालयात विवाह करता येणार नाही, असे निर्देश उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी दिले. 

हेही वाचा - Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना...

या बैठकीला परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, वडनेरचे ठाणेदार राजेंद्र शेटे, अल्लीपूरचे ठाणेदार शैलेश शेळके, नायब तहसीलदार समशेर पठाण, तालुका आरोग्य अधिकारी माधुरी कुचेवार दिघे, मुख्याधिकारी अनिल जगताप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी लग्न समारंभाच्या दृष्टीने 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी पोलिसांमार्फत देण्यात येत आहे, याचा भंग झाल्यास किमान पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे, असे सांगितले. वधू-वरांकडील मंडळींना उपस्थितीबाबत पोलिसांकडून रीतसर परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. नियमाचा भंग झाल्यास सभागृह सील करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात फिरताना व गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. याचा भंग करणाऱ्यांवर पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलेली असून पाचच्या वर गर्दी केल्यास कारवाई होणार आहे. रात्री सातच्या आत दुकाने बंद करावे, असे निर्देश प्रशासनाने यावेळी दिले. अत्यावश्‍यक सेवेसाठी ही वेळ रात्री 9.30 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, पंचायत समिती आणि नगरपालिका हे शहरात आणि तालुक्‍यात या काळात नियंत्रण ठेवणार आहे. पुन्हा संचारबंदी करण्याची वेळ पडू नये, म्हणून नागरिकांनी दक्ष राहण्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यात सामाजिक संघटनांनीही आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - मंगल कार्यालयात लग्न आणखी कठीण, व्यवस्थापनाला 'हे...

आपणच आपले रक्षण करू : दिनेश कदम 
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता, ही लढाई आपली आहे, असे समजून आपणच आपली काळजी घ्या. घराबाहेर अनावश्‍यक बाहेर न पडता आठवड्यातून एकदाच खरेदीसाठी घराबाहेर पडा, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांनी केल्या.

भीती न बाळगता कोरोना तपासणी करा : डॉ. कुचेवार
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी लक्षणं आढळून आल्यास स्वेच्छेने त्वरित कोरोना तपासणी करून घ्यावी. त्यामुळे वेळीच उपचार होऊन संपर्कात आलेल्यांना त्याची लागण होणार नाही व कोरोनावर आळा घालण्यासाठी मदत होईल, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी कुचेवार दिघे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: permission have to be taken for marriage function due to corona cases increases in wardha