esakal | मानव अन् वन्यजीव संघर्ष टाळाण्यासाठी उपाययोजना हव्यात, उच्च न्यायालयात याचिका

बोलून बातमी शोधा

tiger

मानव अन् वन्यजीव संघर्ष टाळाण्यासाठी उपाययोजना हव्यात, उच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, याकरिता रेड लिंक्स कॉन्फेडेरेशन कंपनीच्या संचालक संगीता डोगरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील त्रुटी दूर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

याचिकेनुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव-पशू संघर्षात वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत अनेक व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. सरकारने त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक भरपाई वितरित केली आहे. परंतु, पीडितांना भरपाई देणे व वन्य प्राण्यांना पिंजऱ्यात कैद करणे हा या समस्येवर उपाय नाही. वन परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित जीवन प्रदान करणे आणि वने व वन्य प्राण्यांचे संवर्धन करणे ही सरकारची महत्वाची जबाबदारी आहे. सरकार ही जबाबदारी प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. मानव-पशू संघर्ष होऊ नये याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. याविषयी कायदे व नियमही आहेत.

हेही वाचा: ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

असे असताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसे मरत आहेत. संबंधित व्यक्ती केवळ सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी ठरले, असे म्हणता येणार नाही. हा खून असून त्याला सरकार जबाबदार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वारंवार अशा दूर्दैवी घटना घडत असताना सरकार गप्प आहे. त्यामागचा हेतू स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे, वन परिसरात झालेल्या मानवी मृत्यूंची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात यावे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाला याचिकेत काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे, त्या त्रुटी दूर करण्यासाठी याचिकाकर्तीला सहा आठवड्याचा वेळ देऊन सुनावणी तहकूब केली. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‌ॅड. झिशान हक यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.