पोलिसांच्या बदल्यांमध्ये भेदभाव! कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, सोशल मीडियावर खदखद

अनिल कांबळे
Wednesday, 13 January 2021

काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतरही ते रुजू होण्यास तयार नाहीत. 'झोन सिक्स' नावाने ओळखल्या जाणारा एकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी करीत एकाच जागेवर ठाण मांडले आहे.

नागपूर : शिस्तप्रिय पोलिस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्या केल्या. मात्र, काही जण पोलिस आयुक्तांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले तर काहींनी बदली होऊनही मलाईदार जागा सोडल्या नाही. हीच बाब पोलिस विभागात अनेकांना खटकत असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्या करीत इच्छित जागेवर नियुक्ती दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून मलाईदार पदाला चिकटून असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना धक्के बसले, तर गेल्या अनेक वर्षांपासून 'कलेक्टर' म्हणून कार्यरत असलेल्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अनेक पोलिस कर्मचारी बदली होऊनही त्याच जागेवर अजूनही कार्यरत असल्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही कर्मचारी वरिष्ठांची मर्जी राखत असल्यामुळे त्यांना बदली झालेल्या जागेवर सोडल्या जात नाही, तर काही कर्मचारी तपास आणि अडलेल्या कामांचा बहाणा करीत एकाच जागेवर चिटकून बसत आहेत. एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्याच जागेवर कार्यरत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

मलाईदार पदाला 'फेव्हिकॉल' - 
काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतरही ते रुजू होण्यास तयार नाहीत. 'झोन सिक्स' नावाने ओळखल्या जाणारा एकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी करीत एकाच जागेवर ठाण मांडले आहे. त्याची सहा महिन्यांपूर्वी क्राईममध्ये बदली झाली. परंतु, तो रुजू व्हायला तयार नाही. तो धान्य आणि सुपारी व्यवसायिकांच्या संपर्कात असून ट्रक पकडल्यानंतर वरिष्ठांच्या नावाचा वापर करून पोलिसांवर दबाव टाकत असल्याची चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police disappointed due to partiality in transferred