अमरावतीत पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट; गुन्हेशाखेच्या दोन एपीआयची बदली

संतोष ताकपिरे
Sunday, 1 November 2020

ग्रामीणमध्ये गुन्हे शाखेचा प्रभार आतापर्यंत सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बोंडे यांच्याकडे होता. त्यांची आता दुय्यम कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून बदली झाली, तर येथील दुसरे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांची बदली चांदूरबाजार ठाण्यात करण्यात आली.

अमरावती : शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शनिवारी (ता. 31) निघाले. त्यात प्रामुख्याने स्थानिक गुन्हेशाखेत कार्यरत दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांची बदली झाली. ग्रामीणच्या तब्बल 24 अधिकाऱ्यांची अदलाबदल झाली आहे. 

ग्रामीणमध्ये गुन्हे शाखेचा प्रभार आतापर्यंत सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बोंडे यांच्याकडे होता. त्यांची आता दुय्यम कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून बदली झाली, तर येथील दुसरे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांची बदली चांदूरबाजार ठाण्यात करण्यात आली. ग्रामीणच्या विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे यांच्याकडे चांदूरबाजार ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. धारणीच्या सहाय्यक निरीक्षक लहू मोहंदुळे यांची बदली वाचक शाखेत झाली.

हेही वाचा - आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास नको रे बाबा, रस्त्याच्या दूरवस्थेमुळे वाढले अपघाताचे...

नियंत्रणकक्षातील प्रमेश आत्राम यांना दर्यापूर पोलिस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा यांच्याकडे आता महिला सेलची जबाबदारी राहील, तर येथील पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. येथील पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांना स्थानिक गुन्हेशाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रणील पाटील येवदा, राहुल चौधरी चांदूररेल्वे व माया वैश्‍य धारणी या तिघांची अनुक्रमे मंगरूळदस्तगीर, पथ्रोट व बेनोडा ठाण्यात बदली झाली. 

हेही वाचा - आधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे?

दोन पोलिस अधिकाऱ्यांना मुदतवाढ -

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावानंतर गृहविभागाने पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक ते निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या लांबणीवर टाकल्या होत्या. पोलिस आयुक्तालयातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून, पाच जणांची विनंती अमान्य करण्यात आली. 

अंतर्गत बदल्या या 30 ऑक्‍टोबरच्या आत करणे गरजेचे होते. बाहेर जिल्ह्यातील बदल्यांची यादी गुरुवारी (ता. 29) जाहीर झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी रात्री अंतर्गत बदल्यांसंदर्भात यादी जाहीर केली. त्यात पाच अधिकाऱ्यांनी बदलीची केलेली विनंती अमान्य करून त्यांना आहे त्याच ठिकाणी कार्यरत राहण्याचे आदेश दिले. नांदगावपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण यांची बदली आयुक्तालयातील महिला सेलचे प्रमुख म्हणून, तर येथील निरीक्षक अनिल कुरळकर यांना नांदगावपेठ ठाण्याचा प्रभार सोपविण्यात आला. गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांना 2021 च्या सर्वसाधारण बदल्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अशाच स्वरूपाची मुदतवाढ आर्थिक गुन्हेशाखेत कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल वर यांनाही मिळाली.

हेही वाचा - पुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित    

महिला सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशाली काळे यांची बदली राजापेठ येथे झाली. बदली अमान्य झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वलगावचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश इंगळे खोलापुरीगेट, वाहतूकशाखेचे उपनिरीक्षक बालाजी पुंड, वलगावचे उपनिरीक्षक विनोद चव्हाण तर कोतवालीचे उपनिरीक्षक राजेंद्र गुलदेवकर यांचा समावेश आहे. बदली अमान्य करताना या अधिकाऱ्यांना दिलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी नियमानुसार आवश्‍यक कालावधी पूर्ण झाला नसल्याचे कारण देण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officers transferred in amravati