पोलिसांच्या वाहनात उधारीचे डिझेल, थकबाकीचा आकडा पाहून तुम्हालाही बसेल धक्का

police waiting for fund for transportation expenditure in chandrapur
police waiting for fund for transportation expenditure in chandrapur

चंद्रपूर : पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र डिझेल पंप आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडे पैसे जमा केल्यानंतर टँकरने डिझेलचा पुरवठा होत होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पोलिस विभागाकडे निधीच प्राप्त झाला नाही. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडे डिझेलची मागणी करता आली नाही. स्थानिक पातळीवर एका पंपमालकाकडून डिझेल पुरवठ्याची व्यवस्था केली. पोलिसांवर विश्‍वास ठेवून पंपमालकाने डिझेलचा पुरवठा केला. मात्र, तब्बल साडेआठ लाख रुपये थकीत असल्याने आता पुरवठा थांबविला आहे. त्यामुळे आपआपल्या स्तरावर डिझेलची जुळवाजुळव करण्याची वेळ पोलिस अधिकाऱ्यांवर आली आहे.

चंद्रपूर या मुख्यालयी पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांना डिझेलचा पुरवठा करण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र पंप आहे. या पंपमधून पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर, रामनगर, दुर्गापूर, घुग्घुस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि विविध शाखांचे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांत डिझेल वापरले जाते. या पंपमध्ये डिझेलची खरेदी करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे प्रत्येक महिन्याला गृह विभागाकडून स्वतंत्र निधी पाठविला जातो. महिन्याकाठी साधारणत: 20 ते 26 लाखाचा निधी डिझेलसाठी अपेक्षित आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडे पैसे जमा करून डिझेलची मागणी केली जाते. त्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडून टँकर पाठविला जातो. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु, मागील दोन महिन्यांपासून गृह विभागाकडून पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे डिझेलसाठी निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे या विभागाकडून पेट्रोलियम कंपनीकडे डिझेलची मागणी नोंदविता आली नाही. पंपात उपलब्ध असलेल्या डिझेलच्या साठ्यावर पोलिस अधिकाऱ्यांची वाहने काही दिवस धावली. मात्र, पंपात ठणठणाट झाल्यानंतर वाहने कशी चालवायची, असा प्रश्‍न सर्वच पोलिस अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला. पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांना डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील आदर्श पेट्रोल पंपमालकाशी चर्चा केली. पुरवठा करण्यात येणाऱ्या डिझेलचे पैसे काही दिवसांत दिले जातील, असे सांगण्यात आले. त्यानुसार पंप मालकाने डिझेलचा पुरवठा करण्यास होकार दिला.

पंपमालकाकडून मागील पंधरा दिवसांपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी पंपामध्ये डिझेल पुरवठा करणे सुरू होते. शंभराहून अधिक वाहनांसाठी प्रतिदिन शेकडो लिटर डिझेलचा पुरवठा होत आहे. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत आठेआठ लाखांचे डिझेल झाले. एवढी मोठी रक्कम थकीत असल्याने पंपमालकाने डिझेलचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसमोर वाहने कशी चालवायची, असा प्रश्‍न निर्माण झाला. अखेर, पोलिस उपअधीक्षक (गृह) यांनीही गृहविभागाकडून निधी प्राप्त न झाल्याने हातवर केले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना नाइलाजास्तव आपापल्या स्तरावर डिझेलची सोय करून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.

ठाणेदार घेतात तालुकास्तवरून डिझेल -
जिल्हास्तरावरील पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मुख्यालयात स्वतंत्र डिझेल पंप आहे. मात्र, तालुकास्तरावरील ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या वाहनांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पोलिस निरीक्षकांना स्थानिकपातळीवरील पंपमालकाकडून डिझेलची खरेदी करावी लागते. महिनाभरात खरेदी केलेल्या डिझेलची देयके सादर केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक (गृह) विभागाकडून बिल मंजूर केले जाते. 
गृहविभागाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे डिझेलची मागणी करणे शक्‍य झाले नाही. परिणामी, खासगी पंपधारकांकडून डिझेल घ्यावे लागले. लवकरच ही समस्या निकाली निघणार आहे.
- निशिकांत रामटेके, जनसंपर्क अधिकारी, पोलिस विभाग, चंद्रपूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com