esakal | कोरोना काळात गरिबांना शिवभोजन थाळीचा आधार; थेट घरपोच सेवा मिळत असल्याने लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात गरिबांना शिवभोजन थाळीचा आधार; थेट घरपोच सेवा मिळत असल्याने लाभ

कोरोना काळात गरिबांना शिवभोजन थाळीचा आधार; थेट घरपोच सेवा मिळत असल्याने लाभ

sakal_logo
By
प्रकाश दुर्गे

अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेला शिवभोजन थाळीचा उपक्रम अनेक गरिबांसाठी मोठा आधार ठरत आहे. ही सेवा गरिबांना मोफत देण्यासह घरपोचसुद्धा मिळत असल्याने कडक निर्बंधामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या गरीब नागरिकांची पोटाची भूक भागवली जात आहे.

हेही वाचा: धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू

शिवभोजन अत्यंत गरीब कुटुंबीयांसाठी उपयुक्त ठरत असून हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबीयांसाठी लॉकडाउन दरम्यान मोफत व थेट घरपोच सेवा दिली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा हा उपक्रम गरिबांच्या पोटाची आग विझवत असल्याचे मत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवार (ता. 23) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरीच्या शिवभोजन केंद्रात भेट देऊन शिवभोजनाची पाहणी केली. तसेच शिव भोजन उपक्रम राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अरुणा गेडाम व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

यावेळी आमदार आत्राम म्हणाले की, पोटाची खळगी भरण्यासाठी गरीब कुटुंब अहोरात्र मेहनत घेत असतात. पण कोरोनाच्या संकट काळात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने 'हाताला काम नाही, तर पोटाला अन्नही नाही' अशा विदारक परिस्थितीत शिवभोजनच अशा गरिबांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. गरीब व वंचित घटकांतील नागरिकांच्या पोटाच्या भुकेचा प्रश्‍न शिवभोजन सोडवीत आहे. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाउन दरम्यान शिवभोजन मोफत व मुख्यत: थाळी व वेळ वाढवून दिल्याबद्दल राज्य सरकारचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आभार मानले. यावेळी आमदार आत्राम त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, बबलू हकीम, सुरेंद्र अलोने, दीपक सुनतकर आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे संकटात असलेल्या, आपला रोजगार हरवून बसलेल्या गरीब नागरिकांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी केले. तसेच या उपक्रमात काही अडचणी आल्यास आपणास कळवावे. आपण त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

हेही वाचा: यवतमाळकरांनो, जिल्ह्यात २५ दिवसांत पंधरा हजार जणांची कोरोनावर मात; भीती नको काळजी घ्या

संस्थांनीही पुढे यावे

सध्या कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी सरकारला इच्छा नसतानाही कडक निर्बंध लागू करण्यात आले. आठवड्यातून दोन दिवस कडक व संपूर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक किरकोळ विक्रेते, मजूर, गरीब नागरिक अडचणीत आले आहेत. अशा समस्याग्रस्तांसाठी समाजातील सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन शिवभोजन थाळी, मास्क, सॅनिटायझर, आवश्‍यक साहित्याचे वितरण आदी उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top