या कारणामुळे हमीभाव केंद्रावरील धानखरेदी ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

30 जूनपर्यंत धानखरेदी करण्याचे आदेश आहेत. तालुक्‍यातील विजय लक्ष्मी राइस मिल संस्था व खरेदी विक्री संस्थेअंतर्गत जवळपास तीस हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. खुल्या बाजारात उन्हाळी धानाला अत्यल्प भाव मिळत असल्याने सर्वच शेतकऱ्यांनी केंद्रावरच धाव घेतली. 

लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यात उन्हाळी धानाचे आधारभूत खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यामुळे धानविक्रीला उशीर होत आहे. दरम्यान 30 जून ही खरेदीची शेवटची मुदत आहे. मात्र, एकदिवसाआधीच खरेदीचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी ठप्प पडल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करीत ही मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. 

शासनाच्या आधारभूत धानखरेदी योजनेअंतर्गत लाखांदूर तालुक्‍यात यंदाच्या उन्हाळी हंगामात मागील पंधरवड्यापूर्वीपासून टप्प्याटप्प्याने आधारभूत धानखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. ही केंद्रे प्रत्यक्षात सुरू करण्यास आधीच विलंब झाला. त्यामुळे उन्हाळी धान विकण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर तोबा गर्दी केली होती. परंतु, कासवगतीने होणाऱ्या खरेदीमुळे सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आणलेले धान केंद्राबाहेर पडून आहे. 30 जूनपर्यंत धानखरेदी करण्याचे आदेश आहेत. तालुक्‍यातील विजय लक्ष्मी राइस मिल संस्था व खरेदी विक्री संस्थेअंतर्गत जवळपास तीस हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. खुल्या बाजारात उन्हाळी धानाला अत्यल्प भाव मिळत असल्याने सर्वच शेतकऱ्यांनी केंद्रावरच धाव घेतली. 

हेही वाचा : पेरले पण उगवले नाही...आता घोंगावतेय हे संकट 

दहापट खरेदी शिल्लक 
सद्यःस्थितीत खरेदी झालेल्या धानापेक्षा जवळपास दहापट धानखरेदी व्हायची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासंबंधाने अधिक माहिती घेतली असता, धानखरेदीचे पोर्टल मुदत संपण्यापूर्वीच बंद पडले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी केंद्रावर विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावर पडून असल्याने पावसात भिजून नुकसान होण्याची शक्‍यता आहे. धानखरेदीची मुदत वाढवून पोर्टल तत्काळ सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Portal stopped working

Tags
टॉपिकस
Topic Tags: