डाकिया डाक लाया! ईमेल, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, मेसेंजरच्या काळातही टपाल टिकून

तिरुपती चिट्याला
रविवार, 2 ऑगस्ट 2020

भारतीय डाक विभाग ही भारत देशात पत्रव्यवहार करणारी एकमेव संस्था होय. सन 1766 मध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड क्‍लाईव्ह यांनी फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल व्यवस्था सुरू केली होती. पुढे 1837 मध्ये ही व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली करण्यात आली.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : आपण मामाचं पत्र हरवलं, हा खेळ बालपणी खेळत होतो. मात्र आता या खेळासोबत पत्रेही हरवतात की, काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने घेतलेली भरारी. त्यातून निर्माण झालेल्या ई मेल, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम व इतर ऍप्लिकेशन्स अर्थात इंटरनेटच्या सक्षम संदेशवहन यंत्रणा, यामुळे पोस्ट ऑफिस इतिहासजमा होईल, असाच अनेकांचा होरा होता. पण, अद्यापही ही टपाल व्यवस्था टिकून आहे, हे विशेष.

भारतीय डाक विभाग ही भारत देशात पत्रव्यवहार करणारी एकमेव संस्था होय. सन 1766 मध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड क्‍लाईव्ह यांनी फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल व्यवस्था सुरू केली होती. पुढे 1837 मध्ये ही व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली करण्यात आली.

1854 मध्ये टपाल विभाग स्थापना करण्यात आला. डाक विभागात (मार्च 2017)च्या आकडेवारीनुसार भारतात 4 लाख 33 हजार 417 कर्मचारी कार्यरत आहेत. भारतीय डाक विभाग 1854 पासून भारतातील नागरिकांना अविरत सेवा देत आहे. भारतात विज्ञानाच्या कोणत्याही प्रकाराची सुविधा उपलब्ध नसल्यापासून डाक विभाग पत्रव्यवहाराची सेवा देत आहे. त्याकाळी कोणत्याही प्रकाराचे दळणवळण व्यवस्था नसतानासुद्धा डाक विभाग प्रत्येक गावात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पत्रे पोहोचवत होता. त्याकाळी पोस्टमनची वाट बघितली जायची.

पोस्टमनच्या हातातील पत्र घेऊन वाचत नव्हते तोपर्यंत मनात शुभअशुभाच्या शंका कायम असायच्या. पत्रे, मनिऑर्डर्स, तार अशा अनेक कामांसाठी पोस्ट ऑफीसात जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. आता ही संख्या रोडावली असली, तरी अद्यापही बहिणी आपल्या भावांना राखी पाठवताना पोस्ट ऑफिसचाच पर्याय निवडतात. आता मोबाइलवरून एक क्‍लिक करताच आपला संदेश क्षणार्धात दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. तरीही पोस्टातून येणाऱ्या पत्राने लावलेली हुरहूर वेगळीच असल्याचे अनेकांचे मत आहे.

सविस्तर वाचा - बापरे! या तीन गावांचा तलाठी हरविला…गावकऱ्यांनी केली तहसीलदारांकडे तक्रार

पत्रलिखाणाची सुटली सवय...
पूर्वी दूरवर असलेले आई, वडील, काका, मामा, आत्या, मावशी, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीणी, स्नेही सर्वांना सविस्तर पत्रे पाठवली जायची. या पत्रांचा संग्रह अनेकजण करायचे. काही नामवंतांचा पत्रव्यवहार पुस्तक रूपातही प्रकाशित झाला आहे.पण, अलीकडच्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात लांबलचक पत्र कुणी पाठवत नाही. त्यामुळे पत्रलिखाणाची सवयच सुटल्याचे दिसून येत आहे.
 
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post service is alive also in Mail era