आणखी किती जीव घेणार आलापल्ली-सिरोंचा मार्ग? ठिकठिकाणी खड्डेच खड्डे असल्याने वाढले अपघाताचे प्रमाण

प्रकाश दुर्गे
Monday, 30 November 2020

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर असंख्य खड्डे असून या मार्गावरून जाणे म्हणजे मरणाला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या मार्गाची डागडुजी सुरू असली, तरी फक्त मोठे खड्डेच सील( गिट्टी )टाकून बुजविले जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी छोटे खड्डे बुजविण्यात आले नाहीत.

अहेरी  ( गडचिरोली )  :  येथील आलापल्ली-सिरोंचा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून या मार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या या रस्त्यावर सतत अपघात घडत असून नुकताच येथे एक अवजड ट्रक उलटून चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून हा मार्ग आणखी किती जीव घेणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर असंख्य खड्डे असून या मार्गावरून जाणे म्हणजे मरणाला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या मार्गाची डागडुजी सुरू असली, तरी फक्त मोठे खड्डेच सील( गिट्टी )टाकून बुजविले जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी छोटे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे मोटारसायकल, कारचालकांना येथून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित कंत्राटदाराला आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्याचे कंत्राट मिळाले असून हा कंत्राटदार थातुरमातूर काम करून वेळ मारून नेत असल्याची ओरड जनता करीत आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

मागील पंधरा दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू  आहे. मात्र, कंत्राटदाराच्या मनमर्जीनेच काम होत आहे. खड्डे ज्या पद्धतीने बुजविले गेले पाहिजे तसे काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे हा मार्ग समस्याग्रस्त झाला आहे. याच सिरोंचा मार्गावर एक ट्रक उलटल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याला जबाबदार कोण, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहन चालत असून कधी मोठा अपघात होईल याचा नेम नाही. 

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

नूतनीकरण का नाही?
आलापल्ली-सिरोंचा मार्गावर सध्या डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र, खड्यांमध्ये गिट्टी टाकून डागडुजीचे काम केले जात आहे. परंतु, हे काम योग्यप्रकारे होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. सध्या वाहनधारकांना येथून आवागमन करताना कसरत करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असतानाही योग्यप्रकारे काम होत नसल्याने अपघात घटत आहेत. रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे असतानाही केवळ डागडुजी करून काम निभावले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन या रस्त्याची डागडुजी न करता नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: potholes on aalapalli sironcha highway in aheri of gadchiroli