esakal | युरिया खताच्या किमती झाल्या दुप्पट, शेतकरी त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha

युरिया खताच्या किमती झाल्या दुप्पट, शेतकरी त्रस्त

sakal_logo
By
मनोजकुमार खोब्रागडे

वैरागड: खरीप हंगामातील धानपिकासाठी शेतकर्‍यांना युरिया खत अत्यावश्यक आहे. मात्र, हे खत अनेक कृषी केंद्रातून दुप्पट दराने विकले जात असून, काही ठिकाणी सरकारी नियम धाब्यावर बसवत आधारकार्डविनाच खतविक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने या अवैध प्रकारांना आळा घालावा तसेच शेतकर्‍यांना युरिया खत पुरेसे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! वणी येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धानपिकाची वाढ योग्य प्रकारे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी युरिया खताचा वापर करतात. परंतु खत विकणार्‍या दुकानदाराने खताच्या किमती वाढविल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. मात्र कृषी अधिकारी खतविक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सरकारने प्रत्येक खताच्या किमती ठरवून दिलेल्या आहेत. त्यापेक्षा जास्त किमतीने विकल्यास खतविक्रेत्या दुकानदारांवर कार्यवाही कृषी अधिकारी करू शकतात.

तसेच खताची विक्री करताना कोणतेही खत आधार कार्डशिवाय शेतकर्‍यांना मिळणार नाही, असे फलकच दुकानदारांनी आपल्या दुकानात लावले आहेत. परंतु असे फलक नामधारी असून आधार कार्डशिवाय अनेक दुकानदार शेतकर्‍यांना खते विकत आहेत. मागील वर्षी तुडतुडा या रोगाने अध्र्यापेक्षाही कमी धान उत्पादन झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. कसेतरी इकडून तिकडून पैशाची जुळवाजुळव करून यावर्षी पुन्हा जोमाने शेतीच्या कामाला शेतकरी लागला.

हेही वाचा: मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बिबट्याने केले ठार

परंतु दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने धानपिकाची वाढ योग्य प्रकारे झाली नाही. धानपिकाची योग्य वाढ होण्यासाठी शेतकरी युरिया खताचा वापर करतात. परंतु २९० रुपयांना मिळणारी युरिया खताची बॅग खतविक्रेते आता ४०० ते ४५० रुपयांना विकत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या शेतकर्‍याने बिल मागल्यास खत संपले, असे सांगतात, तर काही दुकानदार युरिया खतासोबत दुसरे खत विकत घेतल्यास युरिया खत मिळेल, असे सांगतात.

त्यामुळे शेतकरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. मात्र कृषी अधिकारी अशा दुकानदारांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. तेव्हा शेतकर्‍याचा वाली कोणीही नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील धानपिकावरच अवलंबून असतात. यंदा आधीच पाऊस वारंवार दगा देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या पिकाचे काय होईल, ही चिंता सतावत आहेत.

हेही वाचा: ओबीसी’ आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे आंदोलन

पीक जगवायला पाण्यासोबतच पिकाच्या भरघोस वाढीसाठी युरिया खत आवश्यक असते. मात्र, हे महत्त्वाचे खत मिळत नसल्याने किंवा मिळत असले, तरी दामदुप्पट किमतीत मिळत असल्याने गरीब शेतकर्‍यांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. आधीच पदरमोड करून त्यांनी रोवणी, निंदणीचा खर्च केला आहे. त्यात आता चढ्या दराने युरिया खत कसे विकत घ्यायचे हा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहे.

व्यापक मोहिमेची आवश्यकता

अनेक दुकानदार खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकर्‍यांना दाम दुप्पट किमतीचे खते विकत आहेत. युरीयासारख्या महत्त्वाच्या खतासाठी शेतकर्‍यांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे या खताची दामदुप्पट व आधार कार्डविना अवैध विक्री करणार्‍या दुकानदारांवर कारवाईसाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

loading image
go to top