खासगी कोविड सेंटर अन् रुग्णांलयांकडून कोरोनाबाधितांची लूट सुरूच, शासनाच्या नियमांना केराची टोपली

प्रमोद काकडे
Saturday, 28 November 2020

टाळेबंदी उठल्यानंतर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला. शासकीय सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडली. त्यानंतर खासगी रुग्णालयांना कोविड उपचार केंद्र सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. परंतु, येथे उपचारासोबतच कोरोनाबाधितांच्या लुटीचे प्रकार समोर आले.

चंद्रपूर : खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यासाठी कोरोनाबाधितांनी अदा केलेल्या देयकांची तपासणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, चंद्रपुरातील बहुतांश खासगी कोविड रुग्णालयांनी या निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे.  महानगरपालिकेकडून अनेकदा संबंधित रुग्णालयांना स्मरणपत्रे पाठविली. परंतु, रुग्णालयाकडून या स्मरणपत्राला कवडीची किंमत दिली जात नाही. उलट देयकांची तपासणी होऊ नये, यासाठी राजकीय दबाव आणला जातो. त्यामुळे कोरोनाच्या संकटात राजकीय दबावापुढे अधिकारी हतबल झाले आहेत. 

हेही वाचा -

टाळेबंदी उठल्यानंतर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला. शासकीय सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडली. त्यानंतर खासगी रुग्णालयांना कोविड उपचार केंद्र सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली. परंतु, येथे उपचारासोबतच कोरोनाबाधितांच्या लुटीचे प्रकार समोर आले. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा देयके उकळले गेले. राज्यात अनेक ठिकाणी यावरून वादंगही झाले. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयातील दर निश्‍चिती शासनाकडून करण्यात आली. परंतु, लुटीचा प्रकार थांबला नाही. शेवटी शासनाने रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लेखापरीक्षक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लेखाअधिकाऱ्यांची चमू रुग्णालयात तैनात केली. या लेखाअधिकाऱ्यांकडे रुग्णांनी अदा केलेल्या देयकांची कागदपत्र पाठवायची होती. परंतु, चंद्रपुरातील बहुतांश खासगी कोविड सेंटरनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले. शहरात सध्या सुमारे 13 खासगी कोविड सेंटर सुरू आहे. येथील कोरोनाबाधितांच्या देयकांच्या तपासणीसाठी मनपाचे मुख्य लेखापरीक्षकांच्या नेतृत्वात 17 लेखाअधिकाऱ्यांचे पथक तयार केले. प्रत्येक अधिकाऱ्याला एका रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, एकाही रुग्णालयांनी कोरानोबाधितांची नियमित देयक संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविली नाही. 

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत पालिकेवर प्रहारचा झेंडा

आतापर्यंत चंद्रपुरातील सर्वच खासगी कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी केवळ दहा टक्केच देयके लेखाअधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. यासंदर्भात मनपाने अनेकदा स्मरणपत्र दिली. परंतु, याची दखल या रुग़्णालयांनी घेतली नाही. सोबतच रोज उपलब्ध खाटा आणि कोविड रुग्णांची दैनंदिन माहिती 'कोविड पोर्टल'वर अद्यावत करणे अपेक्षित होते. तेसुद्धा केले नाही. 

हेही वाचा - महाविकास आघाडी हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार -...

लेखाधिकाऱ्यांकडे आलेल्या काही देयकांची रक्कम कमी करून देण्यात आली. या देयकांची तपासणी करून त्यात कपात करण्यात आली. यामुळे रुग्णांना लाभ झाला आणि रुग्णालयाच्या लुटीवर चाप बसला. त्यामुळे बहुतांश रुग्णालयांनी कपातीच्या भीतीने देयकच पाठविणे बंद केले आहे. जवळपास पन्नास कोरोनाबाधितांनी मनपाकडे आतापर्यंत तक्रारी केल्या आहे. तक्रारीच्या अनुषंगाने मनपाने अनेकदा स्मरणपत्र पाठविली. परंतु, बहुतांश रुग्णालयांनी स्मरणपत्रांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुन्हा मनपाने संबंधित रुग्णालयांना कोरोनाबाधितांच्या देयकांची आठवण करून दिली.

हेही वाचा - पुराने खरीप हंगाम नेला, पण रब्बीला होतोय फायदा; आतापर्यंत आटोपली ६० टक्के पेरणी

शून्य प्रतिसाद, राजकीय दबाव -
डॉ. अनुप वासाडे, डॉ. नगराळे, डॉ. बुक्कावार आणि डॉ. विश्‍वास झाडे यांच्या रुग्णालयांना खासगी कोविड सेंटरची परवानगी दिली आहे. मात्र, या चारही रुग़्णालयांकडून आतापर्यंत एकाही कोरोनाबाधितांची देयक आणि रुग्णासंबंधित कागदपत्र मनपाकडे पाठविली नाही. मनपाच्या स्मरणपत्राला कवडीची किंमत या रुग़्णालयांकडून दिली जात नाही. उलट राजकीय दबाव आणून अधिकाऱ्यांना गप्प बसविले जाते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय छत्रछायेत कोरोबाधितांची लूट सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private covid centers and hospitals taking more fees from corona positive patients in chandrapur