कृषी अधीक्षकांच्या दालनात अचानक येऊन पडले सडके सोयाबीन पीक; युवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन

protesters throw rotten soybean in  cabin of Superintendent of Agriculture
protesters throw rotten soybean in cabin of Superintendent of Agriculture

वर्धा : यंदाच्या हंगामात सोयाबीनवर आलेली खोडकीड आणि पेरलेले बियाणे जमिनीतच दबण्याच्या प्रकाराने जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच हतबल झाला. यामुळे आर्थिक मदत आणि बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा केली. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी युवा परिवर्तन की आवाजने  आंदोलन करीत थेट जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात सोयाबीन टाकले.

यावेळी शेतकऱ्यांनी आणि आंदोलकांनी अधिकाऱ्यांनी प्रश्‍नांचा भडीमार केला. यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे इंगळे यांनी चर्चा करीत येत्या आठ दिवसात बियाणे कंपन्यांबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आश्‍वासन या अधिकाऱ्यांनी दिले. शिवाय यावेळी पीकविमा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात आले.

 त्यांनीही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याचे आश्‍वासन या चर्चेदरम्यान दिले. आंदोलकांनी या अधिकाऱ्यांना आठ नाही तर 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. या काळात शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या मार्गी निघाल्या नाही तर कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात निहाल पांडे, गौरव वानखेडे, सोनू दाते, प्रीतेश इंगळे, हेमंत भोसले, ऋषभ मेंढुले,रोहित कडू, अनुराग हजबे यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या अनागोंदीचा पाढा वाचला. अधिकारी आणि कर्मचारी गावात येत नाही, अडचणीच्या वेळी त्यांच्याकडून कधीच सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली.

बोगस बियाण्यांची एकूण 460 प्रकरणे

जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची अनेक प्रकरणे आली आहेत. तशी एकूण 460 प्रकरणे दाखल झाली आहेत. यापैकी केवळ एकाच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर प्रकरणाबाबत कृषी विभागाचे विशेष लक्ष नसल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे या आंदोलकांनी लक्ष वेधले. यावेळी अधिकाऱ्यांनी इतर कंपन्यांवरही गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल

सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर खोडकीड आली. यामुळे शेतात उभे सोयाबीन वाळले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यास नकार देत त्यावर रोटावेटर फिरविले. तर कपाशीचीही हीच अवस्था आहे. सतत येत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी कपाशीच्या पात्या गळत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com