अरे हे काय! या मोठ्या योजनेला केवळ एक हजार रुपयाची तरतूद; हे कसले नियोजन

seed bomb in akola.jpg
seed bomb in akola.jpg

अकोला : जिल्ह्यात चहूबाजूने असलेल्या डोंगराळ भागात नैसर्गिक पद्धतीने हवेतून बियाण्यांचा छिडकाव करून वृक्ष लागवड करण्यासाठीची सीड बॉम्बिंगची योजना पावसाळ्याच्या तोंडावर रखडली आहे. सदर योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयांची तुटपुंजी तरतूद करण्यात आली आहे. त्यातच 20 दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्या पूर्वी सदर योजना मार्गी लागण्याची शक्यता सुद्धा नगण्य आहे.

जिल्ह्याचे वाढते तापमान व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत 2020-21 या आर्थिक वर्षात डोंगराळ भागात नैसर्गिक पद्धतीने हवेतून बियाण्यांचा छिडकाव करून वृक्ष लागवड करण्यासाठी सीड बॉम्बिंगची योजना राबविण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या उपकरणातून सदर योजना राबवायची आहे. नाविन्यपूर्ण असलेल्या सदर योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषी विभागामार्फत केवळ एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरद्वारे डोंगराळ भागात सीड बॉम्बिंग करण्याच्या खर्चिक योजनेवर केवळ हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पावसाळा सुरू होण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असल्याने योजनेची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेऊन त्यावर अतिरिक्त निधी वळती करण्याची प्रक्रिया सुद्धा लॉकडाऊन झाली आहे. परिणामी पावसाळ्यापूर्वी सदर योजना मार्गी लागण्याची शक्यता नगण्य असल्याने योजना बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे.

यापूर्वी सुद्धा फसला होता प्रयोग
डोंगराळ भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बियाण्यांचा छिडकाव करण्याची योजना यापूर्वी सुद्धा बारगळली आहे. महिला व बालकल्याण विभागा मार्फत सदर योजना राबविण्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु सदर योजनेला महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आयुक्तांनीच परवानगी नाकारल्यामुळे योजना कागदावरच राहिली होती. परिणामी सत्ताधाऱ्यांना योजनेवरील अखर्चित निधी दुसऱ्या योजनेवर वळती करावा लागला होता.

ॲड. आंबेडकरांच्या संकल्पनेतील योजना
भारिप-बमसं व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सदर योजना राबविण्याचे नियोजन यापूर्वी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. परंतु सत्ताधारी सदर योजना राबविण्यास अपयशी ठरल्याचे यापूर्वी सुद्धा दिसून आले आहे.

हेलिकॉप्टरने वर्षाव अन् तुटपुंजी तरतूद
डोंगराळ भागात बियाण्यांचा छिडकाव करण्यासाठीच्या योजनेवर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे डोंगराळ भागात बियाणांचा करण्यासाठी एक हजार रुपयांची तरतूद तुटपुंजे असल्याचे दिसून येत आहे. खर्चिक असलेली सदर योजना राबविण्यासाठी सर्वसाधारण सभेत निधी वळता करून पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याने योजना बारगळण्याची शक्यता अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com