गृहिणींसाठी आनंदाची बातमी; हरभरा डाळीचे भाव वाढण्याची शक्यता धूसर

राजेश रामपूरकर
Wednesday, 23 December 2020

दर घसरू लागल्याने साठेबाजांनीही हरभरा डाळीच्या विक्रीत वाढ केली आहे. मुंबई बंदरावर उडीद, मसूर, मूग डाळ आल्याने त्याचा बाजारावर दबाव पडला आहे. तसेच मागणीही कमी असल्याने या डाळींच्या दरात घसरण झालेली आहे.

नागपूर : देशात हरभऱ्याची लागवड दरवर्षीच्या तुलनेत यंदा नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक झालेली आहे. पिकांसाठी वातावरणही अनुकूल आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई बंदरावरही हरभऱ्याची आयात झालेली आहे. राज्यात ग्राहकांकडून हरभरा डाळीची मागणी कमी झालेली आहे. यंदा हरभरा डाळीचे भाव वाढण्याची शक्यता धूसर आहे. 

वर्षाच्या अखेरच्या पंधरवड्यात डाळींना साधारण मागणी होती. त्यामुळेच तूरडाळीच्या भावात घसरण झाली आहे. उडीद मोगरचे भावही घटलेल्या स्थितीत आहेत. ३१ डिसेंबरनंतर डाळीवरील आयात शुल्कात वाढ झाली तरच डाळींचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात विद्यमान स्थितीत तूरडाळीच्या उताऱ्यात कमी असल्याच्या तक्रारी आहेत. येत्या काळात नवीन तुरीला हमी भावापेक्षा कमी दर मिळाल्यास सरकारकडून खरेदीस प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या - सोन्याचे भाव माहिती आहे का? तब्बल इतक्या रुपयांची झाली घसरण

यंदा दालमिल संचालकांकडेही डाळीची टंचाई आहे. चांगल्या गुणवत्तेच्या तूरडाळीला ५५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्यास तुरीची खरेदी लाभदायक ठरणार असल्याचे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. हरभऱ्याची यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. हरभऱ्याचे बाजारातील भाव घटलेले असून वायदा बाजारातही किमती कमी होऊ लागल्या आहेत.

दर घसरू लागल्याने साठेबाजांनीही हरभरा डाळीच्या विक्रीत वाढ केली आहे. मुंबई बंदरावर उडीद, मसूर, मूग डाळ आल्याने त्याचा बाजारावर दबाव पडला आहे. तसेच मागणीही कमी असल्याने या डाळींच्या दरात घसरण झालेली आहे. ३१ डिसेंबरला सरकारने मसूरवरील आयात शुल्क वाढविल्यास जानेवारीपासून या डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

क्लिक करा - हुंडाबळी : ‘माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा’ अशी चिठ्ठी लिहित महिला डॉक्टरने घेतला गळफास

जुना तांदूळ महागला

मूग मोगरची मागणी कमी असली तरी दीड लाख टन मूग आयात करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. विदेशात मुगाचे भाव अधिक असून आयात न झाल्यास या डाळीचे भाव वाढण्याचे संकेत आहेत. धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा नवीन तांदूळ बाजार येण्याच्या पूर्वीच जुन्या तांदळाचे भावात वाढ झालेली आहे. यावर्षी तांदळाला गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विटंलमागे १००० रुपये अधिक मोजावे लागणार, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulses prices are unlikely to rise this year